Join us  

मातोश्रीच्या गडातूनच बंडखोरी, उमेदवारी नाकारल्याने तृप्ती सावंत अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 10:26 AM

वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारल्याने सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

खलील गिरकर मुंबई : वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारल्याने सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी त्या अर्ज भरतील, अशी माहिती त्यांचे पुतणे भूषण सावंत यांनी दिली. या मतदारसंघातून शिवसेनेने मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. विभाग प्रमुख आमदार अनिल परब यांच्या हस्ते त्यांना ए बी फॉर्म देण्यात आला. 

दिवंगत आमदार बाळा सावंत यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असून, शिवसेनेने विधानसभेतील एकमेव महिला आमदाराला तिकीट नाकारून सावंत यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सावंत यांनी 2015 च्या पोटनिवडणुकीत पराभव केला होता, याकडे पक्षाने दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त करण्यात आली. विद्यमान आमदार असताना उमेदवारी मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात अनिश्चितता व इच्छुकांमध्ये अस्वस्थता होती. 

शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळालेले महापौर महाडेश्वर शुक्रवार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  पक्षाने माझ्या कामावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरून चांगले काम करण्याचा मनोदय महाडेश्वर यांनी व्यक्त केला. या मतदारसंघातील समस्यांची जाणीव असून, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019वंद्रे ईस्ट