फौजदाराच्या घरात ‘भानामती’- विघ्नहर्ता सोसायटीत ‘विघ्न’
By Admin | Updated: August 13, 2014 23:32 IST2014-08-13T22:31:16+5:302014-08-13T23:32:59+5:30
:अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वीकारले सत्यशोधनाचे आव्हान; लवकरच उलगडा

फौजदाराच्या घरात ‘भानामती’- विघ्नहर्ता सोसायटीत ‘विघ्न’
सातारा : घरातल्या वस्तू अचानक गायब होत होत्या. धान्याची पोती फाटत होती. धान्य आपोआप घरात पसरलं जात होतं. वह्या-पुस्तकं, मोबाइल डोळ््यादेखत दिसेनासे होत होते.... पण जेव्हा घरात अचानक आगी लागायला सुरुवात झाली, तेव्हा कुटुंब नखशिखान्त हादरून गेलं. हळूहळू हे प्रकार आसपास कळू लागले आणि संपूर्ण कॉलनीत तोच एक चर्चेचा विषय बनला. अर्थात, या ‘भानामती’चा उलगडाही लवकरच होणार आहे. ‘करणी-भानामती’चा हा प्रकार चक्क एका निवृत्त सहायक फौजदाराच्या घरातच घडतोय... तोही एक ना दोन, सलग दहा दिवस. गेल्या सोमवारपासून हा प्रकार घडायला सुरुवात झाली आणि शनिवारपासून (दि. ९) घरातल्या वस्तू पेटू लागल्या. मंगलमूर्तींचं नाव धारण करणाऱ्या ‘विघ्नहर्ता’ सोसायटीत हे अमंगळ घडू लागल्यामुळं अनेकांचा थरकाप उडालाय. मोळाचा ओढा ते कोंडवे रस्त्यावर ही कॉलनी आहे. त्यातल्या ओढ्यालगत घर असलेल्या पाटील कुटुंबाला सध्या भानामतीनं घेरलंय. (कुटुंबीयांनी यामागील सत्य शोधून काढण्याची लेखी विनंती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला करून सत्यशोधनात सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय; त्यामुळं त्यांचं खरं अडनाव आणि घरातल्या व्यक्तींची नावं त्यांच्या विनंतीवरून गुप्त ठेवली आहेत.) विश्वनाथ पाटील सहायक फौजदार पदावरून निवृत्त झालेत. पण त्यांची शोधक पोलिसी नजरही घरात घडणाऱ्या या प्रकारांनी थिजून गेलीय. पाटील यांना दोन मुलं आणि एक विवाहित मुलगी. मुलगी सुनीता शिंदे ही तिच्या पतीच्या निधनानंतर पाटील यांच्याच घरात विनीत या आपल्या मुलासमवेत राहते. नववीत शिकणाऱ्या विनीतभोवतीच ‘भानामती’ पिंगा घालत आहे, अशी पाटील यांची धारणा आहे. घरात घडणारे सगळे विचित्र प्रकार सर्वप्रथम विनीतलाच दिसतात आणि बाकीचे तिकडे धावतात. पाटील यांची दोन्ही मुलं खासगी नोकरीत आहेत. त्यातील एक विवाहित असून, त्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. घरात अजब प्रकार घडू लागल्यानंतर त्याने आपल्या लहानग्याला आपल्या सासुरवाडीत नेऊन ठेवलंय. (प्रतिनिधी) घरातली धान्याची पोती फाटून धान्य घरभर पसरले सांडलेल्या धान्यात पाऊल आणि हाताचे पंजे उमटले विनीतच्या वह्या त्याच्या पाठीवर असलेल्या दप्तरातून गायब झाल्या घरात चार्जिंगला लावलेला मोबाइल गायब झाला आणि तो घरापासून पन्नास फुटांवर असलेल्या वारुळावर सापडला भिंतीवर टांगलेल्या कपड्यांनी पेट घेतला; तसेच इतर खोल्यांमध्येही आगीचे प्रकार घडले देवघरातून बाळकृष्णाची मूर्तीच गायब झाली साबणाच्या वडीवर आपोआप नाव कोरले गेले स्वयंपाकघरातील फरशीवर चहा घेत असताना मागून फ्रिज अचानक पुढे ढकलला गेला ठिकठिकाणी ठेवलेले पैसे चोरीस जाऊ लागले दूध, तेल आणि इतर पदार्थ आपोआप सांडू लागले घराबाहेर फेकलेल्या काडीपेटी आपोआप पुन्हा घरात येऊ लागल्या रॉकेलच्या कॅनची टोपने आपोआप निघू लागली तयार केलेला स्वयंपाक अचानक गायब कारमधील बिस्कीटे झाली गायब घरात आगी लागण्याचे प्रकार घडू लागल्यानंतर पाटील कुटुंबीयांनी घरातले सगळे गॅस सिलिंडर बाहेर गेटजवळ आणून ठेवलेत. रॉकेलचे सगळे कॅनही घराबाहेर आणलेत. आगपेटीही घरात ठेवली नाही. परंतु बुधवारी सकाळी या कॅनची टोपणे आपोआप उघडल्याचे दिसून आले आणि शेजारी एक आगपेटीही सापडली, असं पाटील यांचं म्हणणं आहे. पाटील यांची मुलगी सुनीता या साड्यांना फॉल-पिको करण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी ग्राहकांच्या साड्यांना झळ पोहोचू नये म्हणून त्या शेजाऱ्यांकडे देऊ केल्या; पण हा प्रकार कळल्यावर त्यांनीही त्या ठेवून घेतल्या नाहीत. घरातलं दूध सतत सांडत असल्यामुळं गेले अनेक दिवस आपण ‘काळा चहा’ घेत असल्याचं पाटील यांच्या पत्नी सविता यांनी सांगितलं. कार आणि दुचाकीपासून धोका आहे म्हणून ही दोन्ही वाहने कॉलनीबाहेर लावण्यात आलीत.