मुंबईत ड्रोन, एअरक्राफ्ट, एअर बलुन्स, पॅराग्लायडर यांना बंदी
By मनीषा म्हात्रे | Updated: March 20, 2024 20:26 IST2024-03-20T20:26:10+5:302024-03-20T20:26:23+5:30
२२ मार्च ते २० एप्रिल दरम्यान हे बंदी आदेश लागू राहणार आहेत.

मुंबईत ड्रोन, एअरक्राफ्ट, एअर बलुन्स, पॅराग्लायडर यांना बंदी
मुंबई: दहशतवाद्यांच्या कायम टार्गेटवर असलेल्या मुंबईत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून यांच्या उड्डाणाना बंदी घालण्यात आली आहे. २२ मार्च ते २० एप्रिल दरम्यान हे बंदी आदेश लागू राहणार आहेत.
अतिरेकी, देशविरोधी आणि विघातक शक्ती मुंबईवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाईट एअरक्राफ्ट किंवा पॅराग्लायडरचा वापर करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेत वरील आदेश जारी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त अकबर पठाण यांनी वरील सर्व प्रकारच्या उड्डाण क्रियांना मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंध करण्याचे आदेश काढले आहेत. यातून पोलीसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप आयुक्त अभियान यांच्या लेखी परवानगीने करण्यात येणाऱ्या कारवाईना सूट देण्यात आली आहे. तर, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर १८८ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी या आदेशाचे पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.