Join us  

"काँग्रेससोबत गेल्यास शिवसेना बंद करेल असं बाळासाहेबांनी म्हटलंच नाही"; आदित्य ठाकरे असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 11:04 AM

एका मुलाखतीमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाबाबत खुलासा केला आहे

Aditya Thackeray : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर सडकून टीका करत आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत गेल्यामुळे शिवसेना सोडल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. तर दुसरीकडे कारवाईच्या भीतीने आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचे ठाकरे गटाचे म्हणणं आहे. अशातच आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत काँग्रेससोबत जाण्याचं कारण सांगितलं आहे.

झी २४तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांना भाजप आणि शिंदे गटाचे वारंवार म्हणणं असतं की बाळासाहेब म्हणाले होते की, ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जावं लागेल त्या दिवशी माझा शिवसेना नावाचा पक्ष मी बंद करेन, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब असं म्हणाले नव्हते असं म्हटलं आहे.

"बाळासाहेब ठाकरे असं अजिबात म्हणाले नव्हते. तुम्ही संपूर्ण व्हिडीओ पाहा. त्यावेळी काँग्रेसच्या नेतेपदासाठी जो काही घोळ चालला होता तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं की असा जर काही घोळ झाला तर मी माझी शिवसेना बंद करीन. बाळासाहेब ठाकरे इथे असताना त्यांनी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना जाहीरपणे समर्थन दिलं होतं. कारण ते चांगले उमेदवार होते. काँग्रेसच्या महापौराला देखील त्यांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेस विरोधी पक्ष असला आणि वैचारिकत्या वेगळ्या असला तरी आज आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलेलो आहोत. कुठल्याही विचाचधारेचा पक्ष असला तर देशाचा, संविधानाचाच विचार करणार. भाजपला मुंबई तोडायची आहे, लोकशाही संपवायची आहे. ईशान्य मुंबईमध्ये मराठी प्रचार करणाऱ्यांना इमारतीमध्ये येऊ दिले नाही. ही मस्ती भाजपमुळे वाढली आहे. असं वातावरण मुंबईत कधीच नव्हतं. मुंबईविरोधी कारवाई जेव्हा भाजप करतं तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे?

त्याकाळी पक्षांमध्ये होत असलेल्या अंतर्गत मतभेदांवरुन बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. "पक्षामध्ये तफावत, मतभिन्नता हे असेच सुरु राहणार असेल तर मी माझं दुकान बंद करेन. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. माझ्या पक्ष काँग्रेससारखा होतोय हे मला जेव्हा कळेल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. शिवसेना निवडणूक लढणार नाही. आज जो मान सन्मान मिळतोय तो शिवसेनेमुळे. माझ्याकडे लोकशाही नाही. करायचं तर एक प्रकारे करा," असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, ठाण्यातल्या शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही पक्षासाठी झटलो आहोत आणि तुम्ही हिंदुत्वाचा विचार सोडला आहे असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी, "पक्षाचा विचार दिल्लीसमोर झुकणं, गुवाहाटीला जाणं, लाचारी करणं कधीच नव्हता. डरपोकपणा ज्यांच्यात आहेत ते स्वतःला कधी शिवसैनिक म्हणू शकत नाहीत. जर त्यांना बंड करायचा होता तर त्यांनी आधीच येऊन सांगायला हवं होतं की आपण सत्ता सोडायला पाहिजे. पण तसं न करता ते घाबरून सुरतला पळाले. हे कधीही शिवसैनिकाचे रक्त नाही हे फक्त गद्दारांचे रक्त होतं," असं प्रत्युत्तर दिलं आहे.  

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबईआदित्य ठाकरेशिवसेनाबाळासाहेब ठाकरे