बालगोविंदांचा ‘थर’थराट!

By Admin | Updated: August 11, 2014 04:15 IST2014-08-11T04:15:20+5:302014-08-11T04:15:20+5:30

बाल हक्क संरक्षण आयोगाने बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडीवर चढविण्यास बंदी घातली असतानाही सध्या सुरू असलेल्या हंडीच्या सरावात बालगोविंदांना थरांवर चढविले जात आहे.

Balagovinds' shudder! | बालगोविंदांचा ‘थर’थराट!

बालगोविंदांचा ‘थर’थराट!

मुंबई : बाल हक्क संरक्षण आयोगाने बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडीवर चढविण्यास बंदी घातली असतानाही सध्या सुरू असलेल्या हंडीच्या सरावात बालगोविंदांना थरांवर चढविले जात आहे. त्यामुळे बालगोविंदा जखमी होण्याची संख्या वाढतच असून, शनिवारसह रविवारही मुंबई उपनगरात हंडीच्या सरावादरम्यान बालगोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडल्या . शिवाय आयोजक आणि दहीहंडी पथकांनी याबाबत नमती भूमिका घेतलेली नाही. परिणामी याबाबत सर्वच स्तरांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
बालहक्क संरक्षण आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर गोविंदा पथकातील बालगोविंदांच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त होत होती. त्यामुळेच सर्वांचेच लक्ष नारळीपौर्णिमेला पार पडणाऱ्या सराव शिबिरांकडे लागून राहिले होते. परंतु, गोविंदा पथकांनी या निर्णयाच्या परिणामांची पर्वा न करता बालगोविंदांनाच ‘एक्का’ म्हणून चढविले. रविवारी शहर-उपनगरांतील वेगवेगळ््या सराव शिबिरांमध्ये सातव्या- आठव्या थरांवर बालगोविंदांना चढवून गोविंदा पथकांनी अतिरेकच केला.
नवी मुंबई येथे झालेल्या बालगोविंदाच्या मृत्यूनंतर तर थरांवर बालगोविंदाना चढविण्याबाबत आता दुहेरी मते व्यक्त होऊ लागली आहेत. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नामांकित दहीहंडी पथके सरावादरम्यान बाल गोविंदांना थरावर चढवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे दहीहंडीच्या दिवशी ऐनवेळेला पंचाईत होऊ नये म्हणून दहीहंडी पथकांनी पर्यायही समोर ठेवला आहे. मात्र तरीही ही पथके आपला बालहट्ट सोडण्यास तयार नाहीत.
आता दहीहंडी पथकांच्या सरावाने आणखी जोर पकडला आहे. या पथकांमध्ये सर्रास बालगोविंदा असून, नारळीपौर्णिमेदिवशी झालेल्या सरावादरम्यानही या बालगोविंदांना थरावर चढविल्याचे चित्र होते. त्यातच सांताक्रूझ येथील सराव शिबिरादरम्यान रविवारी रात्री बालगोविंदा जखमी झाल्याची घटना घडली. शिवाय चिंचपोकळी येथील सराव शिबिरादरम्यान शनिवारी बालगोविंदा जखमी झाला; त्याला केईएम रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने तो बेशुद्ध आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Balagovinds' shudder!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.