मद्यपी पतीचा डोक्यात दांडके घालून खून
By Admin | Updated: August 30, 2014 00:09 IST2014-08-30T00:09:30+5:302014-08-30T00:09:30+5:30
दारू पिऊन सातत्याने किरकोळ कारणावरून पत्नी व मुलांबरोबर भांडणे करणा-या पतीचा मुलाच्या मदतीने डोक्यात लाकडी दांडके घालून खून

मद्यपी पतीचा डोक्यात दांडके घालून खून
चाकण : दारू पिऊन सातत्याने किरकोळ कारणावरून पत्नी व मुलांबरोबर भांडणे करणा-या पतीचा मुलाच्या मदतीने डोक्यात लाकडी दांडके घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आसखेड बुद्रुकची ठाकूरवाडी (ता. खेड) येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडला. या प्रकरणी पत्नी व मुलावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील व ठाणे अंमलदार अनंता शिंदे यांनी दिली.
बाळू भोरू गावडे (वय-५२ वर्षे, रा. आसखेड बुद्रुकची ठाकूरवाडी (ता. खेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. दादाभाऊ ऊर्फ दादू बाळू गावडे व गोदाबाई बाळू गावडे (दोघेही रा. आसखेड बुद्रुक, ता. खेड) या मायलेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराम भोरू गावडे (वय-५५ वर्षे, रा. आसखेड बुद्रुक) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मयत बाळू गावडे याला दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो किरकोळ कारणावरून मुलगा दादाभाऊ व पत्नी गोदाबाई यांना शिवीगाळ, दमदाटी करून जुनी भांडणे उकरून काढायचा. रोजच्या त्रासाला वैतागून रात्रीही नऊ वाजण्याच्या दरम्यान बाळू घरातील लोकांना शिव्या देत होता. त्यामुळे घरासमोरील अंगणात गोदाबाई व दादाभाऊ गावडे यांनी संगनमताने बाळू यांच्या डोक्यात कळकाच्या काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. पाऊस चालला असल्याने व दवाखान्यात नेण्यासाठी गाडीची व्यवस्था नसल्याने बाळू याला जखमी अवस्थेत घरातच झोपविण्यात आले. रात्री जखमी झालेला बाळू रक्तबंबाळ परिस्थितीत झुंज देत मरण पावला. शिवराम गावडे यांनी पुतण्या दादाभाऊ व वहिनी गोदाबाई गावडे यांच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)