भरपाई वाटपाची ढकलगाडी
By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T21:46:26+5:302015-11-04T00:08:28+5:30
रत्नागिरी जिल्हा : आंबा नुकसानभरपाईच्या रकमेत १६ कोटींची वाढ

भरपाई वाटपाची ढकलगाडी
रत्नागिरी : जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आंबा शेतकऱ्यांची सुधारित यादी शासनाकडे पाठविण्यात आली होती, तिला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आधीच्या ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रुपयांमध्ये आता पुन्हा १६ कोटीच्या निधीची भर पडणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे २४ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, जुन्या यादीनुसार भरपाईचे वाटप अजूनही संथ गतीने होत असून, आतापर्यंत केवळ २० टक्केच शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा झाली आहे.
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांचे नुकसान केले आहे. यासाठी कृषी अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी यांनी पंचनामा करून ६४,८७४ शेतकऱ्यांच्या नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. यानुसार शासनाकडून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला होता. त्यानुसार सध्या भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा केली जात आहे. मात्र, भरपाईचे वाटप अतिशय संथ गतीने होत
आहे.
त्यातच या नुकसानभरपाईपासून अनेक शेतकरी वंचित राहिल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे याबाबत पुन्हा पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार पुन्हा सुधारित यादी तयार करण्यात आल्याने वंचित राहिलेल्या २४ हजार शेतकऱ्यांचा समावेश आता या यादीत नव्याने करण्यात आला आहे.
या यादीला शासनाकडून मंजुरी मिळाली असून, या शेतकऱ्यांसाठी १६ कोटी रूपये वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यासाठी भरपाईची एकूण रक्कम ९५,७३,७५,००० रुपये इतकी झाली आहे.
मात्र, आधीच्या ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रुपयांच्या निधीपैकी केवळ १६ कोटी ०१ लाख ८८ हजार ६१२ इतका म्हणजे २० टक्के निधीचेच आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ही भरपाई यावर्षी तरी मिळेल का, असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सातबारा उताऱ्यावर एक नाव असेल त्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे. मात्र, ज्या सातबारावर अनेक नावे आहेत, त्यांच्या नावावर भरपाईची रक्कम टाकताना अडचणी येत आहेत, त्यामुळे विलंब होत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)