खेळ बिनधास्त
By Admin | Updated: August 30, 2015 00:14 IST2015-08-30T00:12:22+5:302015-08-30T00:14:51+5:30
साहसी खेळ म्हणजे नक्की कोणते खेळ, याबबतीत अनेकांची मते वेगवेगळी असू शकतील. मात्र काही खेळ निश्चितपणे सारखेच येतील. जगामध्ये ५० हून अधिक प्रकारांचा साहसी

खेळ बिनधास्त
- रोहित नाईक
साहसी खेळ म्हणजे नक्की कोणते खेळ, याबबतीत अनेकांची मते वेगवेगळी असू शकतील. मात्र काही खेळ निश्चितपणे सारखेच येतील. जगामध्ये ५० हून अधिक प्रकारांचा साहसी खेळांमध्ये समावेश होतो. यातील बहुतेक प्रकार भारतात खेळले जातात. मात्र परदेशात ज्याप्रमाणे या साहसी क्रीडा प्रकारांची क्रेझ पाहायला मिळते, त्या तुलनेत आपल्याकडे ती अगदीच नगण्य आहे.
दुखापत होईल, उगाच कशाला रिस्क घ्यायची, या विचाराने किंवा हे साहसी खेळ खर्चिक असल्याने सहसा कोणी या खेळांकडे वळत नाही. परंतु आपल्याकडे काही जण इतके झपाटलेले असतात, की साहसी क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. जिद्द, मेहनत आणि झुंज देण्याची प्रवृत्ती आणि कधीही हार न मानता केवळ आपले लक्ष्य गाठण्यासाठी झपाटलेले लोकच यात यशस्वी होत असतात. तसे पाहायला गेल्यास बहुतेकदा प्रथमत: साहसी खेळाची मनामध्ये भीती निर्माण होते. मात्र एकदा का यशस्वी झालात, तर मात्र हाच प्रकार पुन:पुन्हा करण्याची एक धुंदी निर्माण होते. आपल्याकडेदेखील अनेक प्रकारचे साहसी खेळ खेळले जातात. त्यातील काही महत्त्वाच्या साहसी खेळांची माहिती...
स्काय डायव्हिंग
हजारो फूट उंचावरून उडणाऱ्या विमानातून बेधडकपणे उडी घेऊन काहीवेळ हवेमध्ये तरंगण्याचा जबरदस्त अनुभव घ्यायचा आणि त्यानंतर पॅराशूटच्या साहाय्याने अलगदपणे जमिनीवर यायचे, यासारखा रोमांचक थरार तुम्हाला फक्त स्काय डायव्हिंगमध्ये अनुभवता येईल. या साहसी प्रकाराचे नुसते फोटो बघूनच यातील रोमांचकतेची कल्पना येते, तर ज्यावेळी अनुभवाल तेव्हा काय होईल? १७९७ साली आंद्रे - जैक्स गार्नरिन यांनी गरम हवेच्या मोठ्या पॅराशूटमधून यशस्वी उडी घेतली आणि तेव्हापासून स्काय डायव्हिंगला सुरुवात झाली. पूर्वी केवळ देशाच्या सैनिकांपर्यंत मर्यादित असलेला हा साहसी खेळ आज सामन्यांसाठी देखील उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा स्काय डायव्हिंग करताना अनेक जण प्रशिक्षकासह उडी घेतात. यामध्ये सर्व परिस्थिती तो प्रशिक्षक सांभाळतो आणि नवोदित स्काय डायव्हरला आपली पहिली स्काय जम्प अनुभवण्याची संधी मिळते.
रिव्हर क्रॉसिंग
एका किनाऱ्यावरून नदीच्या दुसऱ्या किनारी दोरीवरून लटकून पोहोचण्याचा रोमांचक अनुभव रिव्हर क्रॉसिंगमध्ये घेता येतो. या साहसी खेळात सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊनच उतरावे. भक्कम दोरखंड, मजबूत पट्टे यांच्या साहाय्याने बिनधास्तपणे रिव्हर क्रॉसिंगचा थरार अनुभवता येतो. दोरीला लटकून किंवा दोन दोऱ्यांमधून चालत जाणे अशा दोन प्रकारे रिव्हर क्रॉसिंग केले जाते. योग्य प्रशिक्षण, एकाग्रता आणि जिद्द असेल तरच तुम्ही यात यशस्वी होऊ शकाल. मात्र सुरक्षेततेच्या पूर्ण खात्रीनंतरच रिव्हर क्रॉसिंगचा थरार अनुभवावा.
स्कीइंग
पांढऱ्या शुभ्र बर्फावर उंचावरून वेगात स्कीसच्या साहाय्याने खाली येण्याचा थरार म्हणजे स्कीइंग. भारतात काश्मीर हे या साहसी प्रकाराचे सर्वोत्तम स्थान आहे. गुलमर्ग (काश्मीर), कुफ्री (शिमला) आणि औली (उत्तराखंड) येथे स्कीइंगचा थरार अनुभवण्यासाठी कायम साहसीप्रेमींची गर्दी असते. यात स्कीसवर मोक्याच्या वेळी निर्णायक वळण घेत शरिराचा तोल सांभाळणे महत्त्वाचे ठरते. थोडीशी चूकही काही वेळा जीवावर बेतू शकते. यासाठी हा साहसी प्रकार करण्याआधी प्रत्येकाला कसून सराव दिला जातो.
मोटोक्रॉस
तसं पाहिले गेल्यास आपल्याकडे बाईक रेसिंग किंवा कार रेसिंगचा सुरुवातीपासूनच मर्यादित चाहतावर्ग आहे. परंतु जो काही चाहतावर्ग आहे तो पूर्णपणे यासाठी झपाटलेला आहे. गुळगुळीत रस्त्यावरील सुसाट शर्यतीच्या तुलनेत कितीतरी अधिक पटीने थरार व रोमांचकतेचा अनुभव मोटारक्रॉसमध्ये घेता येतो. डर्ट बाईक किंवा डर्ट कार रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाकडे तरुणांचा अधिक कल दिसतो. शहरी भागातील खड्डे कायमच सर्वांसाठी डोकेदुखी असते. मात्र हेच खड्डे मोटारक्रॉस किंवा डर्ट रेससाठी हवेहवेसे वाटतात. चिखलाने भरलेले, मोठमोठे खड्डे आणि वळण व चढण यामुळे वाहनचालकांना आगेकूच करण्यासाठी वेगळेच आव्हान मिळते.
स्कुबा डायव्हिंग
स्काय डायव्हिंगच्या अगदी उलटा अनुभव येतो तो स्कुबा डायव्हिंगमध्ये. अथांग समुद्राच्या तळाशी खोलमध्ये असलेल्या शांत जगाचा अनुभव घेण्याचा रोमांच म्हणजे स्कुबा डायव्हिंग. या साहसी क्रीडा प्रकाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकारचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला पोहणे यायलाच पाहिजे, अशी अट नसते. विशिष्ट सराव घेतल्यानंतर अगदी नवखी व्यक्तीही उत्कृष्टपणे स्कुबा डायव्हिंग करून स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकते. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेण्यास मिळतो.
पॅराग्लायडिंग
उंचावरून श्वास रोखून धरणारी दृश्ये पाहण्याचा आणि सोसाट्याचा वारा अंगावर झेलण्याचा आनंद तुम्ही पॅराग्लायडिंगमध्ये घेऊ शकता. पॅराग्लायडिंगचे हे स्मरणीय क्षण तुम्हाला महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि काश्मीरमध्ये लडाख येथे अनुभवता येतील. साहसी क्रीडामधील सर्वाधिक लोकप्रिय खेळामध्ये पॅराग्लायडिंगचा समावेश नक्कीच आहे. उंच पठारावरून कोणतेही धातू नसलेल्या ग्लायडरच्या साहाय्याने केवळ हवेच्या झोतावर तासन्तास कित्येक हजार फुटांपर्यंत आकाशामध्ये उंच भरारी घेण्याचा आनंद अवर्णनीयच.
राफ्टिंग
नदीतील वेगवान प्रवाहामध्ये हवेने भरलेल्या होडीतून आगेकूच करण्याचा रोमांचक अनुभव राफ्टिंगमधून घेता येतो. हिमालय पर्वतरांगांमधील चंदेरभागा, भागीरथी, सतलज आणि रावी या नद्यांमध्ये राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी अनेक साहसवीर आपला पराक्रम दाखवतात. अत्यंत वेगाने वाहणाऱ्या नदीमध्ये जेव्हा तुम्ही आपल्या टीमसह आगेकूच करता तेव्हा तो क्षण इतका थरारक असतो की त्या क्षणापुरते तुम्ही सर्व जग विसरलेले असता आणि केवळ नदी पार करण्याचे एकच लक्ष्य तुमच्यापुढे असते आणि ज्यावेळी तुम्ही यामध्ये यशस्वी होता तेव्हा त्या क्षणाचे राजे तुम्हीच. मात्र यात सांघिक कामगिरी महत्त्वाची. सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यास यामध्ये तुम्हाला धोकाही होऊ शकतो.
गिर्यारोहण
साहसी क्रीडा प्रकारांमधील सर्वाधिक लोकप्रिय म्हणून गिर्यारोहण ओळखला जातो. उंच पर्वत किंवा शिखर सर करण्याचे कौशल्य यात आवश्यक असते. अत्यंत साहसी, कठीण व कौशल्यपूर्ण खेळ म्हणून याकडे पाहिले जात असलेल्या गिर्यारोहण प्रकाराला अखिल भारतीय क्रीडा मंडळानेदेखील मान्यता दिली आहे. यात अनेक धोके असले तरी या धोक्यांमुळेच साहसी लोकांना गिर्यारोहणाचे आकर्षण आहे. मनुष्य विरुद्ध निसर्ग अशी लढत असलेल्या या खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला आपल्या सामर्थ्याची जाणीव होते. हिमालय पर्वतमालिका तमाम गिर्यारोहकांचे हक्काचे मैदान आहे. रॉक क्लाइंबिंग (खडकारोहण) आणि आइस क्लाइंबिंग (हिमारोहण) हे दोन प्रकार गिर्यारोहणात पडतात.
त्याचवेळी हिमाच्छादित प्रदेश पादाक्रांत करणे, उंच हिमकडे सर करणे यासारखे धाडसी प्रकार आइस क्लाइंबिंगमध्ये होतात. मुळात बर्फावरून घसरण्याची भीती अधिक असल्याने त्यात अधिक प्रमाणात धोका असतो. मात्र यामुळे
मागे फिरतील ते आइस क्लाइंबिंग कसले? गडद रंगाचा चश्मा
आणि हिमकुऱ्हाड याशिवाय आइस क्लाइंबिंग
कदापि शक्य नाही.
पर्वत किंवा उंच शिखर सर करताना प्रामुख्याने वरच्या बाजूला रॉक क्लाइंबिंगचा अनुभव गिर्यारोहकाला घेता येतो. सरळ उभे असलेले सुळके, दोन खडकांमधील भेग पार करणे यासारखे आव्हान यावेळी पार करावे लागते.
1888 साली ए. एफ. ममेरी याने पहिल्यांदा सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या आल्प्सच्या ग्रेयन शिखरावर चढाई केली आणि तेव्हा रॉक क्लाइंबिंगकडे जगाचे लक्ष वेधले गेले.
ट्रेकिंग आणि कॅम्पिंग!
निसर्गाच्या सन्निध्यात राहण्याची आवड असलेल्यांना टे्रकिंग आणि कॅम्पिंगचे विशेष आकर्षण असते. जंगलांमधील काही अज्ञात ठिकाणे शोधण्याचा किंवा एखाद्या उंच ठिकाणी जाण्याचा अनुभव ट्रेकिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. नव्या ठिकाणांचा शोध घेण्यात थोडे जास्त श्रम घ्यावे लागतात, मात्र हे अतिशय रंजक आहे.