...आता एकदाच रडणार बाळ

By Admin | Updated: November 25, 2015 02:45 IST2015-11-25T02:45:15+5:302015-11-25T02:45:15+5:30

बाळाच्या लसीकरणाचा दिवस जसा जवळ येतो, तसे आईला आणि अन्य नातेवाइकांना टेन्शन येऊ लागते. लस दिल्यानंतर बाळाचे रडणे कसे पाहायचे, असा प्रश्नही त्यांना भेडसावतो

... baby crying only once | ...आता एकदाच रडणार बाळ

...आता एकदाच रडणार बाळ

मुंबई : बाळाच्या लसीकरणाचा दिवस जसा जवळ येतो, तसे आईला आणि अन्य नातेवाइकांना टेन्शन येऊ लागते. लस दिल्यानंतर बाळाचे रडणे कसे पाहायचे, असा प्रश्नही त्यांना भेडसावतो. पण अशा टेन्शनमधून आता नवजात शिशूंच्या पालकांना दिलासा मिळणार आहे. बाळाला पहिल्या दीड, अडीच आणि साडेतीन महिन्यांत देण्यात येणाऱ्या २ इंजेक्शनऐवजी एकच इंजेक्शन विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे सहाऐवजी आता तीन इंजेक्शन बाळांना देण्यात येतील. मंगळवारी या ‘पेंटाव्हॅलंट लसी’चा कार्यक्रम मुंबई महानगरपालिका हद्दीत सुरू करण्यात आल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी जाहीर केले.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ० ते १ वर्ष वयोगटातील बालकांसाठी नव्याने ‘पेंटाव्हॅलंट लस’ सुरू करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी उस्मानाबाद येथे ‘पेंटाव्हॅलंट लसी’च्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मंगळवार हा दिवस पालिकेच्या रुग्णालयात ‘लसीकरण दिन’ असतो. त्यामुळे मंगळवारीच मुंबईत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. मुंबईतील महापालिकेच्या सर्व प्रमुख, उपनगरीय रुग्णालयांत आणि १३८ हेल्थ पोस्टमध्ये ही लस मोफत उपलब्ध असणार आहे.
बालकांना ‘पेंटाव्हॅलंट लस’ दिल्याने घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटिस बी आणि हिमोफिलस इन्फल्यूएंझा टाइप बी या आजारांपासून संरक्षण मिळणार आहे. याआधी बालकांना डीपीटी आणि हेपिटायटिस बी अशी दोन इंजेक्शने दिली जायची. पण आता या सर्वांची मिळून एकच लस म्हणजे ‘पेंटाव्हॅलंट लस’ देण्यात येणार आहे. या लसीचे तीन डोस अनुक्रमे दीड महिना, अडीच महिने आणि साडेतीन महिने या वयात देण्यात येणार आहेत, असे डॉ. केसकर यांनी सांगितले.
यापुढे केसकर म्हणाल्या, महापालिका क्षेत्रातील ० ते १ वयोगटातील बालकांना नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत ही लस देण्यात येणार आहे. याआधी दीड महिन्यांची लस घेतलेल्या बालकांना पेंटाव्हॅलंट लस देण्यात येणार नाही. त्यांना आधीप्रमाणेच लस देण्यात येणार आहे. पण, आता पहिल्यांदा दीड महिन्याची ‘पेंटाव्हॅलंट लस’ घेतलेल्या बालकांना मात्र हीच लस देण्यात येईल. (प्रतिनिधी)
‘पेंटाव्हॅलंट’संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी
लसीकरणाच्या उपक्रमातील आताच्या हेपिटायटिस बी आणि डीपीटी प्राथमिक लसीकरणाच्या योजनेच्या जागी पेंटाव्हॅलंट लसीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
संस्थांमध्ये जन्म झालेल्या शिशूंना जन्म झाल्यावर २४ तासांच्या आत जन्मत: देण्यात येणारा हेपिटायटिस ‘बी’चा ‘०’ (शून्य) डोस पूर्वीप्रमाणेच चालू राहील.
१६ ते २४ महिने आणि ५ ते ६ वर्ष या वयोगटात बालकांना देण्यात येणारे डीपीटीचे बूस्टर पूर्वीप्रमाणेच चालू राहतील.
लसीकरणाचे सुधारित वेळापत्रक
लसवेळापत्रक
१. बीसीजी, हेपिटायटिसजन्माच्या वेळी
‘बी’‘०’ ओपीव्ही -‘०’
२. पेंटाव्हॅलंट (डीपीटी + ६ आठवडे,१० आठवडे
हेपिटायटिस बी+ हिब), ओपीव्हीआणि १४ आठवडे
३. गोवर-१ आणि अ जीवनसत्त्व९ ते १२ महिने
४. डीपीटी बूस्टर, ओपीव्ही १६ ते २४ महिने
बूस्टर, गोवर-२
५. डीपीटी बूस्टर-२५ ते ७ वर्षे
पेंटाव्हॅलंट लस
टोचण्याची कारणे -
पेंटाव्हॅलंट लसीचे गंभीर दुष्परिणाम क्वचितच दिसून येतात आणि काहीच बालकांमध्ये सूचित केले गेले आहे. ज्या बालकांना पेंटाव्हॅलंट लस टोचल्यावर गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम दिसून आले आहेत, त्यांना या लसीचा दुसरा डोस देण्यात येऊ नये.

Web Title: ... baby crying only once

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.