Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीसाठी बाळ टाकून दिले, बेडशीट टॅगवरून शोधले आईला; अवघी चार दिवसांची चिमुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 06:32 IST

आईविरुद्ध गुन्हा दाखल

मनीषा म्हात्रेमुंबई : चांगली नोकरी आहे. आता आपण वेलसेटल होऊ शकतो, या विचाराने दोघांनी लग्न केले. लग्नानंतर गर्भवती राहिली. मात्र करिअर डोळ्यापुढे ठेवल्याने ती मुंबईत आणि पती गावी अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली. तिने बाळाला जन्म दिला. मात्र, या बाळाचा सांभाळ एकटीने करून नोकरी कशी करायची, असा यक्ष प्रश्न तिला पडला. नुकत्याच जन्मलेल्या बाळामुळे आपली नोकरी जाण्याची अडचण निर्माण झाली आणि तिने नोकरीला प्राधान्य देत चिमुकलीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्या निष्ठुर मातेने अवघ्या चार दिवसांच्या चिमुकलीला रस्त्यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार भांडुपमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी बेडशिटच्या टॅगवरून आईचा शोध घेतला.

भांडुप एलबीएस रोडवर नेपच्यून लिव्हिंग पॉइंटसमोर रस्त्याच्या कडेला रडणाऱ्या बाळाकडे पादचाऱ्यांचे लक्ष गेले. पादचाऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकलीला सावित्रीबाई फुले रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या आक्रोशाने पोलिस आणि रुग्णालयातील कर्मचारीही हेलावले. बाळावर उपचार सुरू झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव, गणेश पवार यांनी तपास सुरू केला. बाळाशेजारी मिळालेल्या बेडशिटवर असलेला लॉंड्रीचा टॅग पोलिसांसाठी तपासातील महत्त्वपूर्ण धागा होता. हाच धागा पकडून पोलिस त्या महिलेपर्यंत पोहोचले. तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, पण अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अन् बाळाचा स्वीकार...पोलिसांनी महिलेचे समुपदेशन केले. बाळाला पाहून तिनेही हंबरडा फोडला. बाळाला पुन्हा कुशीत घेत स्वीकारले आहे. अखेर, पोलिसांमुळे बाळाची तुटलेली नाळ पुन्हा जुळली. 

 पती म्हणे,  मला बाळ हवे होते... पोलिसांनी महिलेच्या पतीशी संपर्क साधताच, त्याला बाळ हवे होते. त्याने पत्नीला बाळाला घेऊन येण्यास सांगितले, मात्र ती बाळाला घेऊन येत नसल्याचे त्याने सांगितले. 

मूळची दार्जिलिंगची असलेली २२ वर्षीय तरुणी भांडुप परिसरात राहते. २०२१ मध्ये तिचे सिक्कीममधील तरुणासोबत लग्न जुळले. त्यात गर्भवती राहिली. सुरुवातीला दोघांनाही बाळ नको होते. तिने मुंबई गाठली. त्यात नुकतीच एका हॉटेलमध्ये नोकरी लागली. बाळामुळे नोकरी करण्यात अडचण होत होती. जवळही कोणी नसल्याने तिने बाळालाच सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले. सध्या या महिलेलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबई