बेबी पाटणकर प्रकरणातील अटक पोलिसांची पार्श्वभूमी वादग्रस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2015 00:46 IST2015-05-31T00:46:22+5:302015-05-31T00:46:22+5:30

शकुंतला उर्फ बेबी पाटणकर प्रकरणात गजाआड करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघडकीस आला

Babi Patankar arrested in the case | बेबी पाटणकर प्रकरणातील अटक पोलिसांची पार्श्वभूमी वादग्रस्तच

बेबी पाटणकर प्रकरणातील अटक पोलिसांची पार्श्वभूमी वादग्रस्तच

मुंबई : शकुंतला उर्फ बेबी पाटणकर प्रकरणात गजाआड करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघडकीस आला असून त्याचा सविस्तर तपशीलही पोलीसांच्या हाती आला आहे. यातील गांभीर्य लक्षात घेत त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

वरिष्ठ पोलीस
निरीक्षक सुहास गोखले
अंमलीपदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनीटचे प्रमुख सुहास गोखले यांची पोलीस दलातील अत्यंत हुशार अधिकारी अशी ओळख आहे. आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीत त्यांनी संबंधीत अधिकाऱ्याची बाजू मांडून त्यांची नोकरी वाचवली आहे. दहा वर्षांपुर्वी धारावी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना गोखले व पथकाने अहमदनगर येथे फासेपारध्यांवर केलेल्या गोळीबारात एक ठार झाला होता. सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती. पुढे उच्च न्यायालयाने त्यांना या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. मध्यंतरी त्यांना अर्धांगवायुचा झटका आला. मात्र दांडगा जनसंपर्क आणि खबऱ्यांच्या भक्कम जाळयामुळे त्यांनी एमडीविरोधात धडक मोहिम उघडली होती.
गुन्ह्यातील सहभाग
ते बेबी पाटणकरच्या संपर्कात होते. तिच्याबाबतची माहिती गोखले यांनी हेतुपुरस्सर आपल्या वरिष्ठांना उशिरा कळविल्याचा आरोप गुन्हे शाखेने ठेवला. गोखलेंशी फोनवरून बोलल्यानंतर बेबीने दिड महिना गुन्हे शाखेला गुंगारा दिला. गोखलेंनी याआधीही अंमलीपदार्थविरोधी पथकात दोन वेळा कर्तव्य बजावले होते. त्यामुळे अशा गंभीर प्रकरणात बेबीबाबतच्या माहितीवरून त्यांनी तपास, कारवाई करणे आवश्यक होते.
गौतम गायकवाड,
यशवंत पार्टे
पोलीस निरिक्षक गौतम गायकवाड नाशिक पोलीस दलात नेमणुकीस असताना त्यांना लाच स्वीकारल्याच्या आरोपात अंमलीपदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. या प्रकरणी ते निलंबीत होते. गायकवाड यांची विपश्यना आणि अध्यात्माकडे ओढा असून ते याविषयी अनेकांना धडेही देतात. यशवंत पार्टे हे स्पेशल ब्रांचचे हवालदार असून त्यांची कारकिर्द वादग्रस्त आहे.
गुन्ह्यातील सहभाग
गायकवाड यांच्या पत्नीचे माहेर वरळी येथे आहे. याच वस्तीत बेबी पाटणकरचा अडडा आहे. या दोघांची ओळख जुनी असून या प्रकरणी केलेल्या तपासात गायकवाड आणि बेबी यांच्यात सुमारे दिडशे फोन कॉलचे आदानप्रदान झाले. मुळात प्रियकर व साथीदार धर्मराज काळोखेला पकडून देण्यासाठी बेबीने गायकवाड व पार्टे यांना हाताशी धरले होते. गायकवाड व पार्टे यांनी काळोखेच्या खंडाळा येथील घराची रेकी केली. पुढे एका खबऱ्यामार्फत दोघांनी सातारा पोलिसांना काळोखेची माहिती दिली. सातारा पोलिसांनी धाड घातली तेव्हा पार्टे तेथे उपस्थित होता. बेबीचे नाव सातारा पोलिसांच्या तपासात उघड झाले तेव्हा या दोघांनी फोन बंद केले. फरार असतानागायकवाड यांनी तिची भेटही घेतली होती.

सुधाकर सारंग, ज्योतीराम माने
सारंग हा अमलीपदार्थविरोधी पथकाच्या कांदिवली युनीटमध्ये फौजदार आहेत. तर माने गुन्हे शाखेच्या ख्ांडणीविरोधी पथकात सहाय्यक फौजदार म्हणून नेमणुकीस आहेत. यापैकी सारंग हे पार्टेचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. ते बेबीच्या संपर्कात होते. तसेच या गुन्हयात पार्टेला सहकार्य केले. माने यांनी काळोखे व बेबी यांना धमकावून त्यांच्याकडील अंमलीपदार्थांचा साठा हडपण्याचा प्रयत्न केला होता. माने यांनाही दोघांची आधीपासून माहिती होती. तेही बेबीच्या संपर्कात होते.

९ मार्च : बेबीच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी खबऱ्या मार्फत सातारा पोलिसांना धर्मराज काळोखेच्या पुण्यातील खंडाळा गावातील घराची माहिती दिली. सातारा पोलिसांनी काळोखेला ताब्यात घेतले. पुढे त्याच्या शेजाऱ्याच्या घरातून तब्बल ११० किलो एमडीचा साठा हस्तगत करण्यात आला. त्याला त्या दिवशी अटक करण्यात आली. काळोखे मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून नेमणुकीस होता.
१० मार्च : काळोखेच्या
अटकेची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यातील काळोखेचे कपाट उघडण्यात आले. त्यातही सुमारे ११ किलो एमडी सापडले. सोबत परदेशी चलन, मद्याच्या बाटल्या आणि अन्य साहित्य सापडले. मरिनड्राईव्ह पोलिसांनी काळोखेविरोधात स्वतंत्र गुन्हा नोंदवला.
११ मार्च : सातारा पोलिसांनी काळोखेकडे केलेल्या चौकशीतून बेबी पाटणकरचे नाव पुढे आले. सातारा पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. पुढल्या दोनेक दिवसात सातारा पोलिसांची पथके मुंबईत आली. मरिन ड्राईव्ह पोलिसांसह गुन्हे शाखेने बेबीचा शोध सुरू केला.
२२ एप्रिल : सिंधुदुर्गच्या कुडाळ गावात दडून बसलेली बेबी खासगी बसमधून मुंबईला येत होती. ही माहिती मिळताच समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी पनवेलहून तीला व मुलगा सतीश पाटणकरला ताब्यात घेतले. या दोघांना मरिनड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात दिले. याच दिवशी हे प्र्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.
२४ एप्रिल : काळोखेच्या अटक घडवून आणल्याची कबुली बेबीने गुन्हे शाखेच्या चौकशीत दिली. तिचा सविस्तर जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. या जबाबात तिने संपर्कात असलेल्या पोलिसांची नावे, गुन्हयातील सहभाग याबाबत बरीच माहिती दिली.
१५ मे : गुन्हे शाखेने केरळहून पॉलराज दुराईस्वामी पडाईयाची या एमडी वितरकाला अटक केली.
२९ मे : वरिष्ठ निरिक्षक सुहास गोखलेंसह ५ पोलीस अधिकारी गजाआड.
३० मे : न्यायालयाने आरोपी पोलिसांना ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत धाडले.

निवृत्तीच्या दोन दिवसांआधी अटक
आरोपी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुहास गोखले ३१ मे रोजी सेवा निवृत्त होणार होते. मात्र ३१ मे रोजी रविवार असल्याने त्यांचा निरोप समारंभ आज ठेवण्यात आला होता. त्याआधीच त्यांना अटक झाली.

Web Title: Babi Patankar arrested in the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.