अझरूद्दीनचे कुणीही करू शकत नाही खच्चीकरण!
By Admin | Updated: May 30, 2015 22:38 IST2015-05-30T22:38:22+5:302015-05-30T22:38:22+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीन याच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या ‘टिझर’चे प्रकाशन नुकतेच झाले.

अझरूद्दीनचे कुणीही करू शकत नाही खच्चीकरण!
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीन याच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या ‘टिझर’चे प्रकाशन नुकतेच झाले. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटात अझरूद्दीनची भूमिका अभिनेता इमरान हाश्मी याने केली आहे. हाश्मी आणि स्वत: अझरूद्दीन यांनी या टीझरचे प्रकाशन केले.
आयपीएलच्या अंतिम सामन्यावेळी रविवारी झालेल्या या कार्यक्रमात नवज्योतसिंग सिद्धू, अजय जडेजा आणि पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर यांनी अझरूद्दीन आणि हाश्मी यांचे स्वागत केले. सुत्रांच्या मते, सिद्धूने खूप भावूक होत क्रिकेट कारकीर्दीतील अझरसोबतच्या आठवणी जागवल्या. आपल्या अनोख्या शैलीत अझरचे कौतुक करत सिद्धूने मोहंमद अझरूद्दीनचे कुणीही खच्चीकरण करू शकत नाही, असे नमूद केले.
‘अझर’ नामक या चित्रपटात तीन प्रमुख पैलुंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अझरची देवावरील श्रद्धा, त्याच्या दोन पत्नी आणि सामना निश्चितीचा आरोप झाल्यानंतरचा त्याचा संघर्ष या तीन पैलुंचा उलगडा करण्यात आला. अझरच्या चाहत्यांनी टिझरचे जोरदार स्वागत केले.
या चित्रपटाचे दिग्दर्शन टोनी डिसुझा यांनी केले असून ‘बालाजी’साठी शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी याची निर्मिती केली आहे. एनपी सिंह आणि स्नेहा रंजन हेही चित्रपटाचे निर्माते आहेत. बालाजी मोशन पिक्चर्स आणि एमएसएम मोशन पिक्सर्च यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली. पुढील वर्षी १३ मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. (प्रतिनिधी)