Join us  

अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्ही कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 6:07 PM

Azad Samaj Party : आझाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे"अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आंदोलने व्हायला हवीत आणि आता आम्ही त्यांच्याविरोधात आक्रमक झालो आहोत."

मुंबई : अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर आझाद समाज पार्टीतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आझाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी अर्णब देशद्रोही असल्याच्या घोषणांसह 'अर्णब गोस्वामी मुर्दाबाद, आझाद समाज पार्टी जिंदाबाद...' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात चंद्रशेखर आझाद आणि आझाद समाज पार्टीचे बॅनर होते.

याचबरोबर, 'मराठीची बदनामी करणारा अर्णब गोस्वामी मुर्दाबाद, शहीद सैनिकांची थट्टा करणारा अर्णब गोस्वामी मुर्दाबाद', अशा अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या. कार्यालयात घुसताना पोलीस प्रशासनाने आंदोलकांना ताब्यात घेतले. आझाद समाज पार्टीचे अतुल खरात, विक्की शिंगारे, नागेश शिर्के, नितीन जाधव, योगेश आहिरे यांच्यासह पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 

या प्रकरणानंतर आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आंदोलने व्हायला हवीत आणि आता आम्ही त्यांच्याविरोधात आक्रमक झालो आहोत. अर्णब गोस्वामी यांनी मराठी लोकांचा अपमान केला आहे. मराठीची थट्टा केली आहे. त्यांना अटक झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी आंदोलन केले होते. मात्र, अर्णब गोस्वामी यांचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर भाजपा या प्रकरणावर शांत राहिले. अर्णब गोस्वामी यांच्यावर केंद्र सरकार काही कारवाई करणार आहे का? असा सवालही यावेळी राहुल प्रधान यांनी केला.

टॅग्स :अर्णब गोस्वामीमुंबईआंदोलन