योगापाठोपाठ आता आयुर्वेद दिन
By Admin | Updated: May 11, 2015 02:11 IST2015-05-11T02:11:23+5:302015-05-11T02:11:23+5:30
आता ‘जागतिक आयुर्वेद दिना’साठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी एका कार्यक्रमावेळी दिली.

योगापाठोपाठ आता आयुर्वेद दिन
मुंबई : भारत व्याधीमुक्त करायचा आहे, या दिशेने पहिले पाऊल म्हणून २१ जून या दिवशी जागतिक योग दिन साजरा होणार आहे. याच धर्तीवर आता ‘जागतिक आयुर्वेद दिना’साठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी एका कार्यक्रमावेळी दिली.
आयुर्वेद हे प्राचीन परिपूर्ण वैद्यकीय शास्त्र आहे. आत्ता आयुर्वेदाला राजाश्रय मिळाला आहे. पण लोकाश्रय मिळवून देणे अजून बाकी आहे. जुनाट विकारांवर उपचारासाठी आयुर्वेद उपयुक्त असल्याने भारतासह अमेरिका, युरोप, मलेशिया इत्यादी देशांत पूरक अथवा पर्यायी चिकित्सा पद्धत म्हणून आयुर्वेदाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. संसर्गजन्य आजार हे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होतात. आयुर्वेदोक्त दिनचर्या, ऋतुचर्या यांचा अवलंब केल्यास हे विकार दूर राहतील. ११६व्या वर्धापन दिनानिमित्त ‘साण्डू आयुर्वेद पुरस्कारां’चे आयोजन शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात रविवार, १० मेला करण्यात आले होते, त्या वेळी नाईक यांनी वरील विचार व्यक्त केले.
वैद्य य. गो. जोशी, वैद्य व्ही. के. पाध्ये, वैद्य रमेश नानल यांना ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ देऊन गौरविण्यात आले. तर वैद्य विनय वेलणकर, वैद्य नरेंद्र गुजराथी, वैद्य धनराज गहुकर, वैद्य रवींद्र वात्सायन आणि वैद्य मदन वाजपेयी यांना ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आयुर्वेदातील संशोधन थांबले आहे. सुश्रूत आणि त्याच्या नंतरच्या काळात आयुर्वेदात संशोधन झाले. त्यानंतर संशोधन झाल्याचे दिसत नाही. अनेक वैद्यांना श्लोक पाठ असतात. पण त्याचे विवेचन माहित नसते. विरोधी गुणांची चिकित्सा का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडे नाहीत, असे वैद्य य.गो. जोशी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.
प्रत्येक वैद्याला आयुर्वेदाचा अभिमान वाटला पाहिजे. पण, अभिमान वाटण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. अभ्यास केल्यावर आत्मविश्वास वाढतो आणि यशप्राप्ती होते. काही वैद्यांच्या दवाखान्यांत रुग्णांची गर्दी असते. पण त्यांना संज्ञांचे अर्थदेखील माहीत नसतात. व्याधीवर औषध देणे आणि पैसे घेणे इतकेच ते करीत असतात असे या वेळी वक्त्यांनी सांगितले.