आक्सा झाले ‘हादसा’बीच
By Admin | Updated: May 13, 2015 00:46 IST2015-05-13T00:46:09+5:302015-05-13T00:46:09+5:30
पोहण्यासाठी धोकादायक म्हणून ओळखल्या जात असलेल्या मालाड (प.)च्या आक्सा बीचवर कालपासून बेपत्ता असलेल्या शेखर गायकवाड (२२, रा. कालिना) या तरुणाचा मृतदेह

आक्सा झाले ‘हादसा’बीच
मनोहर कुंभेजकर, मुंबई
पोहण्यासाठी धोकादायक म्हणून ओळखल्या जात असलेल्या मालाड (प.)च्या आक्सा बीचवर कालपासून बेपत्ता असलेल्या शेखर गायकवाड (२२, रा. कालिना) या तरुणाचा मृतदेह आक्सा समुद्रकिनारी पहाटे पाचच्या सुमारास सापडला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता तीन झाली आहे. तर या दुर्घटनेत वाचलेल्या मोनिका फर्नांडिस (२१, रा. मरोळ) हिला वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले. कालच्या दुर्घटनेत विरारच्या दीपशिखा गुप्ता (२०) या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी आता तरुणीचाही बुडून मृत्यू झाल्यामुळे आक्सा बीचच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्या ८ मार्चपासून या ठिकाणी आजपर्यंत ५ तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे आक्सा बीचचा मृत्युआलेख सध्या वाढतोय. आक्सा हा हादसा बीच असून १९९९ पासून येथे आजपर्यंत ८० जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ९ जुलै २००० रोजी या ठिकाणी मालाड (पूर्व) येथील १२ तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. आक्सा बीचवर खड्डे असून वाळूनंतर सुमारे ७ फुटांचा उंचवटा मग परत वाळू, अशी बीचची रचना आहे. ओहोटीत तरुण-तरुणी पोहायला जातात, मात्र भरती सुरू झाली की ते पाण्यात ओढले जातात. पाण्याबाहेर निघता येत नसल्याने येथील खड्ड्यात सापडून बुडून मृत्यू होतो, अशी माहिती पालिकेचे सेवानिवृत जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
सध्या या ठिकाणी एकूण रोज दोन पाळ्यांत एकूण ९ जीवरक्षक असून यामध्ये १ कायमस्वरूपी, ५ कंत्राटी आणि ३ हंगामी जीवरक्षकांचा समावेश आहे. सध्या ३ किमीचा आक्सा हा हादसा बीच म्हणून ओळखला जात आहे. या ठिकाणी ५ ते ६ जादा जीवरक्षक तैनात करण्याची गरज असल्याचे मत रजनीकांत माशेलकर यांनी व्यक्त केले.
पालिकेच्या अग्निशामक दलाने किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या सहा प्रमुख किनाऱ्यांसाठी सुमारे ३.५ कोटींची साधने विकत घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते. मात्र अजूनही ही साधने बीचवर आलेली नसल्याची माहिती येथील कंत्राटी जीवरक्षकांनी दिली. सध्या उन्हाळ्याची सुटी असल्याने रोज पर्यटक जास्त संख्येने येथे येत आहेत. त्यामुळे अधिक जीवरक्षकांचीही या ठिकाणी गरज आहे. पोलिसांचे गस्ती पथकदेखील या धोकादायक बीचवर असणे गरजेचे आहे.