लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर शासनाने आता बडगा उगारला आहे. अनधिकृतरीत्या झाड तोडण्यासाठी असलेली एक हजार रुपयांची शिक्षा आता थेट ५० हजार रुपये करण्यात आली आहे. याबाबतच्या अधिनियमात शासन अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आल्याची माहिती सोमवारी विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आली.
झाडे तोडण्याबाबत अधिनियम १९६४ कलम २ मध्ये अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आणि राज्यातील अन्य नगरपालिका परिसरात करण्यात येणाऱ्या अवैध वृक्षतोडीला पायबंद घालण्यासाठी ही तजवीज करण्यात आली आहे. राज्य शासनाने अधिनियमात सुधारणा करून अवैधरीत्या झाडे तोडणाऱ्या व्यक्तीस आता ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद केली आहे. यापूर्वी या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंडाची तरतूद होती.
या संदर्भात अधिकार प्रदान केलेल्या वृक्ष अधिकारी यांनी चौकशी केल्यानंतर आणि संबंधित व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर योग्य निर्णय घेऊन हा दंड आकारण्यात यावा, असेही अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.
झाड तोडणे म्हणजे काय?‘झाड तोडणे’ या व्याख्येमध्ये झाड मारून टाकण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी ते जाळणे, कापणे किंवा छाटणे अथवा झाडाच्या बुंध्याभोवतालची साल कोरणे, गर्डलिंग करणे किंवा झाडाची साल काढणे या कृत्यांचा समावेश आहे.
मुंबईत विविध कारणांसाठी केली जाते वृक्षतोडमालाड आयटी पार्क येथे सुमारे १६६५ झाडांची अवैधरित्या कत्तल झाली. मेट्रो प्रकल्पासाठी शेकडो झाडे जमीनदोस्त करण्यात आली.जोगेश्वरी येथील उद्यानामध्ये झाडांच्या बुंध्याला आग लावून वृक्षतोड सुरू आहे.