कोकणात दहशतवादविरोधी पथकाची जागृती
By Admin | Updated: January 7, 2015 22:20 IST2015-01-07T22:20:18+5:302015-01-07T22:20:18+5:30
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी वर्तमान ध्वज महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाधीन केला.

कोकणात दहशतवादविरोधी पथकाची जागृती
अलिबाग : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी वर्तमान ध्वज महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाधीन केला. या दिवसाचे औचित्य साधून पोलीस दलातर्फे हा दिवस ‘रायझिंग डे’ (स्थापना दिवस) म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून, विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून त्यांच्यामध्ये दहशतवादविरोधी जागरूकता रुजविण्याचे अभियान यंदा महाराष्ट्र पोलीसच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या ठाणे विभागाने संपूर्ण कोकणात आयोजित केले असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीसच्या दहशतवादविरोधी पथकातील पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली.
कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात विविध शाळांतील विद्यार्थ्यांकरिता हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. कोकणात या अभियानांतर्गत एकूण ३६ कार्यक्रम होत असल्याचे घोडके यांनी पुढे सांगितले.
रायगडमधील या अभियानात महाराष्ट्र पोलीसच्या दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दहशतवाद रोखण्याकरिता विद्यार्थीस्तरावर नेमकी कोणती जागरूकता बाळगली पाहिजे याबाबत मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. अलिबागचे पोलीस निरीक्षक भागवत चौधरी , पोलीस उप निरीक्षक किशोर साळे यांनी विद्यार्थी सतर्कता विषय तर नागरी हक्क संरक्षण विभागाचे सहा. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी नागरी हक्क संरक्षण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्रा. बालाजी जावळे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. (प्रतिनिधी)
रायगडमध्ये चार ठिकाणी कार्यक्रम
४जिल्ह्यातील नेरळ येथील कोठारी हायस्कूल, कर्जतमधील शारदा विद्यालय येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत बुधवारी सकाळी अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील ना.ना.पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित व्याख्यानास ३०० विद्यार्थी उपस्थित होते. तर अलिबागमधील जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलमध्ये झालेल्या व्याख्यानास १०० विद्यार्थी उपस्थित होते.