डॉक्टर, विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधात जागृती
By Admin | Updated: May 27, 2014 01:41 IST2014-05-27T01:41:09+5:302014-05-27T01:41:09+5:30
तंबाखू हा आरोग्यास हानिकारक असून यामुळेच कर्करोग होण्याचा धोका वाढतो. याविषयी अनेक प्रकारे जनजागृती करूनही विविध प्रकारे तंबाखूचे सेवन अजूनही मोठ्या प्रमाणात केले जाते

डॉक्टर, विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधात जागृती
मुंबई : तंबाखू हा आरोग्यास हानिकारक असून यामुळेच कर्करोग होण्याचा धोका वाढतो. याविषयी अनेक प्रकारे जनजागृती करूनही विविध प्रकारे तंबाखूचे सेवन अजूनही मोठ्या प्रमाणात केले जाते. महापालिकेच्या रुग्णालयातील कर्मचारी तंबाखूविरोधी दिनाच्या दिवशी तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणार आहेत. इतक्या वर्षांपासून रुग्णालयामध्ये धूम्रपान करण्यास मनाई होती. आता नवीन नियमानुसार, महापालिका रुग्णालयांमध्ये तंबाखू सेवनास बंदी घालण्यात आली आहे. तंबाखूविरोधात महापालिकेने हे एक पाऊल पुढे टाकले असून याचबरोबरीने जनजागृतीचा कार्यक्रमदेखील केला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रमुख रुग्णालयाच्या संचालक डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली. तंबाखूचे सेवन केल्यामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. सुगंधी तंबाखूवर बंदी घालूनही अजूनही काही छुप्या मार्गाद्वारे सुगंधी तंबाखू विकला जात आहे. ३१ मे हा तंबाखूविरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून सार्वजनिक ठिकाणी महापालिकेचे काही डॉक्टर आणि विद्यार्थी तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करणार आहेत. यासाठी पथनाट्ये बसवण्यात येणार आहेत. नायर दंत रुग्णालय, नायर, केईएम आणि सायन रुग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नायर दंत रुग्णालयाचे विद्यार्थी आणि डॉक्टर हे मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेर, एसटी डेपोबाहेर ३१ मे रोजी पथनाट्य सादर करणार आहेत. इतर रुग्णालये आपल्या आसपासच्या गर्दीच्या परिसरामध्ये आणि झोपडपट्टी परिसरात जाऊन जनजागृती करणार आहेत. दंत महाविद्यालयातील कर्मचारी मी तंबाखू खाणार नाही, अशी शपथ घेणार असल्याचे डॉ. नागदा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)