राज्यपालांच्या हस्ते लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST2021-02-05T04:30:36+5:302021-02-05T04:30:36+5:30
निष्ठा, समर्पण भावनेने कार्य केल्यास देशात सुवर्णयुग येईल राज्यपाल : भगतसिंह काेश्यारी यांच्या हस्ते लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार प्रदान ...

राज्यपालांच्या हस्ते लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार प्रदान
निष्ठा, समर्पण भावनेने कार्य केल्यास देशात सुवर्णयुग येईल
राज्यपाल : भगतसिंह काेश्यारी यांच्या हस्ते लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील लोक विविध क्षेत्रात नवोन्मेष व नवसृजनातून उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून ते युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. एक प्रगत देश म्हणून उदयास येण्याच्या निर्णायक वळणावर देश उभा असताना युवा पिढीने निष्ठा व समर्पण भावनेने कार्य केल्यास देशात सुवर्णयुग येईल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.
सेंद्रिय शेती, बांधकाम व्यवसाय, उद्योग, आदरातिथ्य, आरोग्यसेवा यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३४ निवडक व्यक्ती व संस्थांना नुकतेच राज्यपालांच्या उपस्थितीत लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शनिवार, २३ जानेवारी राेजी सहारा स्टार हाॅटेल येथे पार पडलेल्या सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, उद्योजिका उषा काकडे, निर्माता-दिग्दर्शक नागनाथ मंजुळे, हिरे व्यापारी किरीट भन्साळी आणि लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ट्रेंड सेटर्स काॅफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. अनेक क्षेत्रात देश गरुडझेप घेत आहे. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. अशा वेळी नवउद्यमी युवक देशाला खूप पुढे नेऊ शकतात. याकरिता नवउद्योजकांची पिढी तयार झाली पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
सुवर्ण महोत्सवी वाटचाल करीत असलेले लोकमत वृत्तपत्र खऱ्या अर्थाने जनतेचा आवाज झाले आहे, असेही राज्यपाल म्हणाले. मी दिल्लीला जातो, तसेच राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार असल्यामुळे गोव्यालाही जात असतो. या दोन्ही ठिकाणी लोकमत वृत्तपत्र आवर्जून वाचायला मिळते, असे राज्यपाल म्हणाले.
तर, राजकारण सोडून इतर क्षेत्रात काम करणाऱ्यांचे फारसे कौतुक होत नाही. पण, लोकमतने समाजातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा ‘ट्रेंड सेटर’ म्हणून सन्मान करण्याचा नवा पायंडा या देशात निर्माण केला आहे. लोकमतसारखे दैनिक अशा ट्रेंड सेटरना एका व्यासपीठावरून आपले कौतुक करते. तेेव्हा त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते, आपणही असे काही करण्याची ऊर्जा मिळते, असे मंत्री जयंत पाटील म्हणाले.
आपल्या प्रास्ताविकात विजय दर्डा यांनी ट्रेंड सेटर पुरस्कारामागील भूमिका विशद केली. आपल्या कर्तृत्वाने ट्रेंड सेट केले त्यांची दखल लोकमतने नेहमीच घेतली आहे. त्यांचा गौरव केला. अभ्यासपूर्ण मांडणी करत संसदेत विविध प्रश्न मांडणाऱ्या खासदारांसाठी ‘लोकमत पार्लमेंटेरियन ॲवाॅर्ड’पासून आपल्या उपक्रमशीलतेने ग्रामपंचायतीत बदल घडविणाऱ्यांसाठी ‘लोकमत सरपंच ॲवाॅर्ड’पर्यंत समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा लोकमतने कायम गौरव केला आहे. अनेक अर्थांनी ‘लोकमत’सुद्धा ट्रेंड सेटर आहे. देशात हिंदी भाषिकांची अनेक राज्ये आहेत. अन्य काही भाषांचेही तसेच आहे. त्यामुळे अशा ठिकाणी भाषिक वृत्तपत्रांचा पसारा मोठा असल्याचे आपण पाहतो. मात्र, मराठी भाषकांचे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असूनही आज लोकमतच्या वीस लाख प्रती दररोज निघतात. तर, २ कोटी ५५ लाख वाचक आहेत. मराठीच्या प्रज्ञावान आणि चोखंदळ वाचकांपर्यंत लोकमत पोहोचला असून त्यांचा विश्वास संपादित केला आहे, असे ते म्हणाले.
* मराठी भाषा-संस्कृतीवर प्रेम करायला शिकले पाहिजे - सचिन पिळगावकर
मराठी चित्रपट चांगला प्रवास करणारच आहे. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे मराठी माणसाचे मराठी भाषा-संस्कृतीवरचे प्रेम. त्यावरच मराठी चित्रपटांची वाटचाल ठरणार आहे.
मराठी माणसाने मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करायला शिकले पाहिजे, असे सचिन पिळगावकर म्हणाले. आज दोन मराठी माणसे भेटल्यावर हिंदीत बोलतात हे पाहून खूप विचित्र वाटते. आजकाल आपण मराठी खाद्यपदार्थसुद्धा खात नाही. बाकीचे पदार्थ खावे वाटतात. डाळींबीची-मटकीची उसळ, झुणका भाकर वगैरे खावेसे वाटत नाही. पोटात नसेल तर ओठात कसे येणार. आपण मराठीवर प्रेम करतो याचा अर्थ इतरांचा दुस्वास करतो असे नाही. १९६२ला प्रथम कॅमेऱ्याला सामोरा गेलो. आज या चित्रपटसृष्टीत हे माझे ५८वे वर्ष आहे. एखाद्या कलाकाराची मेहनत, काम जितके महत्त्वाचे आहे तितकेच कलाकारांना, कलाकृतीला प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतो तो महत्त्वाचा असतो. हा प्रतिसादच ट्रेंड सेट करत असतो.
* चित्रपट हा थिएटरमध्ये समूहाने पाहण्याचा कलाविष्कार - नागराज मंजुळे
कोरोनासारखे काही येईल आणि आपण वर्षभर घरात कोंडले जाऊ, असे कधी कोणाला वाटले नाही. त्यातूनही आपण सगळे मार्ग काढत आहोत. आज वर्षभरानंतर प्रथमच या जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहतो आहे. या कोरोना काळात दैनंदिन जीवनात जी कामे करतो त्याचे अनेक मार्ग समोर आले. ‘ओटीटी’सारख्या प्लॅटफाॅर्मवर चित्रपट येऊ लागले. पण, चित्रपट समूहाने, थिएटरमध्ये पाहण्याची बाब आहे. एकट्याने सिनेमा पाहताना आणि समूहात पाहताना त्याचे आकलन वेगळे असते. सैराट, फँड्रीसारखे सिनेमे समूहानेच पाहण्याचे आहेत. एकट्याने पाहताना कदाचित त्याचे आकलन वेगळे होत असते. त्यामुळे सिनेमे आधी थिएटरमध्ये यायला हवेत, लोकांनी तिथेच आधी ते पाहायला हवेत असे मला वाटते. चित्रपट हा तंत्राचा कलाविष्कार आहे. त्यात अनेकांचा सहभाग असतो. तो बनविण्यात अनेक अडथळे असतात. पण, दृश्य आणि सशक्त माध्यम असल्याने अनेक जण पाहतात. त्याचा परिणाम मोठा असतो. तर, कविता ही एकट्याने वाचली जाते. त्याचा परिणाम वाचकापुरता असतो. शिवाय, आता कविता किती जण वाचतात, हाही मुद्दा आहेच. माझा ‘झुंड’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. तर, तार नावाचा लघुपट प्रदर्शित झाला आहे. शिवाजी महाराजांवरील तीन चित्रपटांच्या मालिकेची तयारी सुरू आहे.
-----------------