Join us

गरजूंच्या रोजगाराची काळजी घेणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 02:09 IST

मयूर जैन ; एक हजार मुलांना देणार प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले. स्वयंरोजगाराकडे तरुण वळले आहेत. आर्थिक गणिते कोलमडली असताना गरजूंना रोजगार मिळावा म्हणून एक अवलिया मोफत प्रशिक्षण देत आहे. या अवलियाने आतापर्यंत २२ जणांना मोटारसायकल दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले आहे. त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळणार आहे.मयूर जैन असे या अवलियाचे नाव आहे.  सामाजिक भान म्हणून त्याने प्रारंभ नावाचा उपक्रम सुरू केला. याअंतर्गत १८ ते ३० वयोगटांतील मुलांना मोटारसायकलचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांचा कौशल्य विकास केला जातो. सहा महिन्यांचे हे प्रशिक्षण असते. मोटारसायकल दुरुस्ती, विक्री, अशा विविध क्षेत्रांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र दिले जाते. त्या आधारावर रोजगार मिळू शकतो. व्यवसाय करणे शक्य आहे. मीरा-भाईंदर येथे चंदन व्हॅली, सी-विंग येथे हे प्रशिक्षण दिले जाते.आपण समाजाचे देणे लागतो. मलाही कोणी तरी आधार दिला. त्यामुळेच मी स्वत:च्या पायावर उभा राहू शकलो. एका बड्या कंपनीचा विक्रेता म्हणून काम करू शकलो. अशी संधी या क्षेत्रात काम इच्छिणाऱ्या प्रत्येकाला मिळावी या हेतूने हा उपक्रम सुरू आहे. २२ मुलांना आतापर्यंत प्रशिक्षण दिले आहे. २०३० पर्यंत एक हजार मुलांना प्रशिक्षण देण्याचा मानस आहे, असे मयूरने सांगितले. या उपक्रमात अधिकाधिक जणांनी सहभागी व्हावे, असाही त्याचा मानस आहे.