Join us
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के हृदयविकार रुग्णांची उपचारासाठी टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 02:01 IST

दीर्घकालीन प्रभावी यंत्रणा तयार करण्याची गरज 

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे आरोग्यसेवा क्षेत्राच्या दैनंदिन कामकाज पद्धतीत बदल झाला आहे आणि कोरोनानंतरच्या काळात वाढत्या आव्हानांशी तसेच भविष्याशी जुळवून घेण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. विशेषत: हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रुग्णांबाबत आरोग्यसेवेतील मार्गदर्शक तत्त्वे आणि उपचार यांमध्ये असंख्य बदल झाले आहेत.

हृदयविकार असलेल्या रुग्णांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो आणि यामुळे उपचार व काळजी घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागला आहे. डॉक्टरांना भेटायला येणाऱ्या रुग्णांच्या मनात या बदलांबद्दल भीती बसलेली आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टर व रुग्ण यांनी समोरासमोर बसून उपचार पद्धतींबद्दल चर्चा करण्याचे व विशिष्ट उपचार घेण्याचे प्रसंग कमी झाले आहेत. परिस्थिती लक्षात घेत रुग्णांमध्येही टेलि-कन्सल्टन्सी लोकप्रिय झाली आहे. अजूनही प्रवास व इतर काही गोष्टींवर निर्बंध लादलेले असल्यामुळे, तसेच रुग्णालयात जाण्यास रुग्ण घाबरत असल्याने त्यांच्यासाठी ‘टेलि-कन्सल्टन्सी’ हा एक सोयीचा पर्याय आहे.अर्थात, हृदयविकाराची गंभीर लक्षणे असणाºया रुग्णांसाठी ‘टेलि-कन्सल्टन्सी’च्या माध्यमाचा फार उपयोग होत नाही आणि त्यांना हे माध्यम नेहमीसाठी वापरूनही चालणार नाही.

युरोपियन सोसायटी आॅफ कार्डिओलॉजीने केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये रुग्णालयात येऊन तातडीचे उपचार घेणाºया हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी कमी झाली.म्हणूनच रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घेणे हे सुरक्षित आहे, याबाबत या रुग्णांमध्ये विश्वास वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे मत डॉ. राहुल गुप्ता यांनी व्यक्त केले.

‘टेलि-कन्सल्टन्सी’चा प्रभावी मार्ग

सेवांमुळे देशातील हृदयविकाराच्या उपचारासंबंधी अंत:दृष्टीदेखील मिळू शकते आणि आरोग्यसेवेची मार्गदर्शक तत्त्वे आणि तंत्रज्ञान यांचे प्रमाण वाढवण्यासाठी या केसेसची नोंद करण्याचा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. रुग्णाला रुग्णालयात फार काळ राहावे लागू नये म्हणून त्याला शक्यतो लवकर घरी सोडण्यासारख्या अनेक प्रक्रिया राबवाव्या लागतील, तसेच उपचारांचा पाठपुरावादेखील त्याला घरातून घेता येईल, त्यामुळे गोष्टी सुरळीत होत जातील, तसा आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :डॉक्टरमहाराष्ट्र