Join us

अवनीनं गोळी घालण्याशिवाय काही पर्याय ठेवला नव्हता- सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 20:02 IST

यवतमाळमध्ये अवनी या वाघिणीला ठार केल्यानंतर राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

मुंबई- यवतमाळमध्ये अवनी या वाघिणीला ठार केल्यानंतर राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. विरोधकांकडून मुनगंटीवारांच्या राजीनाम्याची मागणी होत असून, त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. विशेष म्हणजे या टीकाकारांमध्ये केंद्रीय मंत्री मनेका गांधींचाही समावेश आहे. त्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनीही या प्रकरणात खुलासा केला आहे.एबीपी या वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वाघिणीला मारल्याच्या कृत्याचं समर्थन केलं आहे. वन खात्याला वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती, 13 जण वाघिणीचे शिकार झाले. पकडताना तिने हल्ला केल्याने गोळी घातल्याचं सांगत त्यांनी वनविभागाच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला मारल्याचा आरोप करणं चुकीचा आहे. मनेका गांधींवरही मुनगंटीवारांनी टीका केली आहे. मनेका गांधींच्या मतदारसंघातही वाघाला मारण्यात आलं होतं. मनेका गांधींनी घटनेची पूर्ण माहिती घ्यावी आणि मगच बोलावे, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.  अवनीला वाघिणीच्या प्रकरणात मुनगंटीवारांचा राजीनामा मागणं चुकीचं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांची पाठराखण केली आहे. तसेच वाघिणीच्या प्रकरणात मनेका गांधींची भेट घेणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर दुसरीकडे अवनी वाघीण शिकार प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत अवनीसंदर्भातला मुद्दा उपस्थित करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना धारेवर धरण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.अवनी किंवा टी-१ नावाच्या वाघिणीच्या मृत्यूवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वाघिणीला मारताना नियम पाळला गेला नसल्याचा आरोप आता वन्यजीवप्रेमींकडून होत आहे. पांढरकवडा भागात दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला शुक्रवारी रात्री वनविभागाच्या पथकाने बोराटीच्या जंगलात गोळ्या घालून ठार केले. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिने वन विभागाच्या चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली. 

टॅग्स :सुधीर मुनगंटीवार