आत्महत्येपासून परावृत्त करणारा अवलिया

By admin | Published: December 1, 2015 01:56 AM2015-12-01T01:56:22+5:302015-12-01T01:56:22+5:30

घरगुती भांडण, मानसिक तणाव, वरिष्ठांचा त्रास अशा विविध त्रासांना कंटाळून कोपरी येथील खाडीत आत्महत्या करण्याकरिता येणाऱ्यांना या टोकाच्या विचारापासून परावृत्त करून जगण्याची

Avalia refraining from suicide | आत्महत्येपासून परावृत्त करणारा अवलिया

आत्महत्येपासून परावृत्त करणारा अवलिया

Next

- अजित मांडके,  ठाणे
घरगुती भांडण, मानसिक तणाव, वरिष्ठांचा त्रास अशा विविध त्रासांना कंटाळून कोपरी येथील खाडीत आत्महत्या करण्याकरिता येणाऱ्यांना या टोकाच्या विचारापासून परावृत्त करून जगण्याची उमेद देण्याचे कार्य ठाणे महापालिकेतील कर्मचारी भारत मोरे हे सातत्याने करीत आहेत. शनिवारी त्यांनी एका वृद्धाला जीवदान दिले. याच एका वर्षात मोरे यांनी सहा जणांचे जीव वाचवले आहेत.
महापालिका सेवेत काम करणे म्हणजे आठ तास पाट्या टाकणे आणि घरी जाऊन आराम करणे, असाच काही जण अर्थ काढतात. परंतु, पालिकेच्या सेवेत काम करून पुन्हा समाजसेवेचा वारसा जपणारे कोपरी येथील भारत मोरे हे त्याला अपवाद आहेत. ठाणे महापालिकेत वेल्डर म्हणून ते काम करीत असून वयाच्या ४५ व्या वर्षी कोपरी खाडीत जीव द्यायला येणाऱ्यांवर त्यांची बारीक नजर असते. शनिवारी, एक ७४ वर्षीय वृद्ध येथील गणपती विसर्जन घाटावर आले. त्या वेळेस त्यांचा पाय घसरला की, त्यांनी स्वत: उडी मारली... ते खाडीतील चिखलात रुतले. मोरे यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांनी लागलीच धावत जाऊन त्यांचे प्राण वाचविले व त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. तो वयोवृद्ध मानसिक तणावाखाली असल्याने त्याला घरच्यांबद्दल धड माहिती देता येत नव्हती. त्यामुळे त्यांचा फोटो मोरे यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्हायरल केला. तसेच पोलिसांनी तीन तास विविध ठिकाणी त्यांना नेऊन त्यांच्या नातेवाइकांना शोधण्यासाठी केलेले अथक प्रयत्न अखेर यशस्वी झाले.
मोरे यांनी यापूर्वीही याच ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी आलेल्या सहा जणांचे प्राण वाचविले आहेत. केवळ त्यांनी प्राणच वाचविले नाही, तर त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्याचे मोलाचे कार्यही केले आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्याकरिता आलेल्या व मोरेंनी मतपरिवर्तन करून परत पाठवलेल्यांमध्ये एका पोलिसाचा आणि एका महिलेचा समावेश आहे. केवळ माणसेच नव्हे तर जखमी अवस्थेत असलेल्या फ्लेमिंंगोलाही मोरेंनी जीवदान दिले आहे.

वृक्ष लागवडीचा संकल्प जोपासला
- मोरे यांनी वृक्ष लागवडीचा संकल्पही जोपासला असून वृक्ष जगविण्यासाठी ते रोज या वृक्षांना पाणी देतात. २००७ पासून ते वृक्ष लागवडीचे काम करीत असून आतापर्यंत त्यांनी २५० विविध जातींच्या औषधी वृक्षांबरोबरच आंबा, कडुनिंब, बोरं, चोरचिंच, पिंपळ आदींसह विविध जातींच्या वृक्षांचे संवर्धन त्यांनी केले आहे.
आपला, पत्नीचा, मुलांचा अथवा लग्नाचा वाढदिवस अशा विविध दिवशी ते वृक्षारोपण करून साजरा करतात. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्याची दखल पोलिसांनी घेतली असून ते परिमंडळ-५ च्या शांतता कमिटीवर सदस्य म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून काम पाहत आहेत.

Web Title: Avalia refraining from suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.