Lalbaugcha Raja: मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील सुमारे १०० स्वमग्न मुलांनी त्यांच्या पालकांसह आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर त्यांनी माटुंगा येथील जीएसबी गणरायाचेही दर्शन घेतले. चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर ही स्वमग्न (ऑटिझमग्रस्त) मुलांवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या तसंच त्यांच्या शैक्षणिक समस्यांबाबत सखोल मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेने विशेष मुलांसाठी हे गणराय दर्शन घडवून आणले. चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर ही संस्था गेली १२ वर्ष स्वमग्न मुलांना लालबागच्या राजाचे दर्शन घडवते. "स्वमग्न मुलांना समाजात मिसळणे अधिक सोपे जावे, तसंच त्यांच्यात सामाजिक संवाद कौशल्य विकसित व्हावीत हा यामागचा हेतू आहे. पण गेली दोन वर्ष करोना महसाथीमुळे हे शक्य झाले नव्हते", अशी माहिती चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचे संस्थापक संचालक, ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुमित शिंदे यांनी दिली.
स्वमग्न (ऑटिस्टिक) विद्यार्थ्यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन!
By सीमा महांगडे | Updated: September 5, 2022 20:36 IST