राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेकडून मराठी शाळेच्या उपक्रमांची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST2021-02-05T04:26:46+5:302021-02-05T04:26:46+5:30
विद्यार्थी विकासासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : धारावी, सायन, प्रतीक्षानगर, कुर्ला परिसरातील कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी ज्या ...

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेकडून मराठी शाळेच्या उपक्रमांची दखल
विद्यार्थी विकासासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावी, सायन, प्रतीक्षानगर, कुर्ला परिसरातील कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात, त्या सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. ‘जागतिक आव्हानांना तोंड देणारा सक्षम विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेतून घडवण्याचा डी. एस. हायस्कूल सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे’ नमूद करत नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या वेबसाइटवर डी. एस. हायस्कूलच्या यशोगाथेचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील फक्त पाच शाळांना हा गौरव प्राप्त झाला आहे.
आयसीएसई, सीबीएसई, आयबी यांसारख्या बोर्डांच्या भरमसाठ शैक्षणिक शुल्क आकारणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या गुणवत्तेच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, त्या सर्व शैक्षणिक सुविधा मराठी माध्यमाच्या डी. एस. हायस्कूलमध्ये उपलब्ध करून देण्याकडे गेल्या काही वर्षांपासून विशेष प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वतोपरी शारीरिक वाढीसाठी- क्रीडानिपुणता विकसित करण्यासाठी ‘लेट्स गेट फिट’, विज्ञानातील मूलभूत संकल्पना प्रात्यक्षिकांसह समजावून सांगणारा ‘रोबोटिक्स’ अभ्यासक्रम, गायन-संगीताची आवड जोपासण्यासाठी संगीत अकादमी, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा आणि डिजिटल लर्निंग आदी अनेक उपक्रम शाळेत राबवले जात आहेत. या सर्व उपक्रमांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याचे डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्थेने ‘सक्षम नेतृत्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्राचा अवलंब’ या वर्गवारीत उत्तम कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शाळांमध्ये डी. एस. हायस्कूलची निवड करणे, ही आमच्यासाठी निश्चितच गौरवास्पद बाब आहे. करोनाकाळात शाळा बंद असतानाही डिजिटल लर्निंगच्या माध्यमातून आम्ही संगीत, क्रीडा, स्पोकन इंग्रजी, शैक्षणिक समुपदेशन आदी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडचे उपक्रम नियमितपणे राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, असे प्रधान यांनी सांगितले.
....................