हजर विद्यार्थी केले गैरहजर
By Admin | Updated: February 16, 2017 02:34 IST2017-02-16T02:34:06+5:302017-02-16T02:34:06+5:30
लॉ परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकालाची वाट पाहात होते, पण निकाल लागल्यावर तब्बल ६४ विद्यार्थी परीक्षेला हजर असूनही गैरहजर

हजर विद्यार्थी केले गैरहजर
मुंबई : लॉ परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकालाची वाट पाहात होते, पण निकाल लागल्यावर तब्बल ६४ विद्यार्थी परीक्षेला हजर असूनही गैरहजर दाखवून नापास करण्यात आल्याने त्यांना धक्का बसला आहे. मुंबई विद्यापीठाचा परीक्षांचा गोंधळ अजूनही सुरू असून, यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला आहे.
माटुंग्याच्या न्यू लॉ महाविद्यालयातील ६४ विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाने गैरहजर असल्यामुळे नापास केले आहे. तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरच्या केटी विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. केटी असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अडीच महिन्यांपूर्वी झाली. परीक्षा होऊन ८६ दिवस उलटल्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मे महिन्यात शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्या आधी असा गोंधळ झाल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत.
विद्यापीठ कायद्यानुसार, कोणत्याही परीक्षेचा निकाल लवकरात लवकर म्हणजे ३५ दिवसांत तर उशिरा म्हणजे ४५ दिवसांत जाहीर करणे अनिवार्य आहे, पण विद्यापीठाने या नियमाचे उल्लंघन केले असून, तब्बल ८६ दिवसांनी निकाल लावून त्यातही चुका केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून योग्य निकाल द्यावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले, या विद्यार्थ्यांची परीक्षा मे महिन्यात आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना नापास केल्यामुळे विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्जही करता येणे शक्य नाही. या निकालामुळे विद्यार्थ्यांची धावपळ तर होणारच आहे, पण मानसिक ताण वाढणार आहे. या मानसिक ताणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाल्यास त्याची
जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे तातडीने हा प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे.
विद्यार्थी परीक्षेस हजर असल्यास विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल. हजर विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवून नापास करण्यात आले असेल, तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयाने उपस्थितीच्या दाखल्यासह परीक्षा नियंत्रकांशी संपर्क साधावा, असे मुंबई विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)