Join us  

महापालिकेत बोट नव्हे, तर चेहऱ्याद्वारे लागणार हजेरी; डी विभाग कार्यालयात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 2:03 AM

कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद करण्यासाठी अवलंबिण्यात आलेल्या या नवीन यंत्रणेचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी केले.

मुंबई : कोरोनाचा प्रसार मुंबईत सुरू झाल्यानंतर बायोमेट्रिक मशीनचा वापर तत्काळ बंद करण्यात आला. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे संसर्गजन्य आजारांची लागण होऊ नये, यासाठी फेस रेकग्नाईज आधार व्हेरिफाईड अटेंडन्स सिस्टीम लागू करण्यात येणार आहे. या नवीन हजेरीपटाची सुरुवात डी विभाग कार्यालयापासून करण्यात आली आहे. 

कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद करण्यासाठी अवलंबिण्यात आलेल्या या नवीन यंत्रणेचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी केले. नायर रुग्णालयात यशस्वी प्रयोग झाल्यानंतर महापालिकेच्या डी विभाग कार्यालयात या प्रणालीचा अवलंब केला जात आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक मशीनवर बोटाचे ठसे लावण्याची गरज नाही. मशीनसमोर उभे राहिल्यास त्या व्यक्तीच्या आधारकार्डवरील फोटोशी सांगड घालून हजेरी नोंद होऊ शकते. त्यामुळे भविष्यात बोटाच्या ठशांमुळे बायोमेट्रिक हजेरी नोंदवून कोरोना व इतर संसर्गजन्य आजाराचा संभाव्य धोका टाळता येणार आहे. 

अचूक व्यक्तीची हजेरी लागणारया प्रणालीमुळे हजेरी नोंदवणारी व्यक्ती ही मोबाइलला आधार क्रमांक लिंक केलेली व्यक्ती आहे किंवा अन्य कोणी? याप्रमाणे प्रणाली त्याचा स्वीकार करेल आणि हजेरी नोंदवेल. त्यामुळे अचूक व्यक्तीची हजेरी लागेल. ज्यामुळे कर्मचाऱ्यांची दक्षता आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालय व इतर कार्यालयांमध्ये या मशिन्स बसवल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अशी लागणार हजेरी... या प्रणालीत आधार लिंक केल्यानंतर कर्मचाऱ्याच्या मोबाइलवर ओटीपी क्रमांक येईल. हा ओटीपी या प्रणालीत समाविष्ठ केल्यानंतर प्रणाली अपटेड होईल. त्यानंतर प्रणालीवर संबंधित कर्मचाऱ्यांचे डोळे बंद करून छायाचित्र टिपले जाईल. यावर संबंधित व्यक्तीचे काढलेले छायाचित्र आणि आधारकार्डवरील छायाचित्र यातील चेहरा किती टक्के जुळतो हे प्रणालीवर दिसेल. प्रणालीने त्यांचा डेटा स्वीकारल्यास पुढील कार्यवाही होईल.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका