एअरपोर्टचा बनावट एन्ट्री पास बनवत घुसखोरीचा प्रयत्न; सहार पोलिसांकडून २२ वर्षीय तरुणाला अटक
By गौरी टेंबकर | Updated: June 1, 2024 17:41 IST2024-06-01T17:40:21+5:302024-06-01T17:41:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: एअरपोर्टचा बनावट एन्ट्री पास तयार करून विमानतळावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जितेंद्र दलाई (२२) नामक ...

एअरपोर्टचा बनावट एन्ट्री पास बनवत घुसखोरीचा प्रयत्न; सहार पोलिसांकडून २२ वर्षीय तरुणाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: एअरपोर्टचा बनावट एन्ट्री पास तयार करून विमानतळावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जितेंद्र दलाई (२२) नामक तरुणाला सहार पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार दिनेशकुमार दिवेदी (५७) हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ( सीआयएसएफ ) मध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून एअरपोर्ट एन्ट्री पासची तपासणी करून वैध पास असलेल्या कर्मचाऱ्यांना विमानतळ परिसरात प्रवेश देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या तक्रारीनुसार ३० मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जितेंद्र विमानतळामध्ये प्रवेश करण्यासाठी स्टाफ गेट (वेस्ट) लेव्हल ३ या ठिकाणी आला. त्याने त्याच्याकडचा एअरपोर्ट एन्ट्री पास दाखवत विमानतळात प्रवेश कराचा प्रयत्न केला. मात्र दिवेदी यांना सदर पासबाबत शंका आल्याने त्यांनी तो बारकाईने तपासला. तेव्हा तो पास कलर फोटो कॉपी असल्याचे त्यांना आढळले. तसेच त्यावर कोणत्याही प्रकारचे सिक्युरिटी फीचर्स नव्हते. तेव्हा तो बनावट पास असल्याचे उघड झाले.
द्विवेदी यांनी जितेंद्रकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले की एका कंपनीच्या सिगरेट शॉपमध्ये तो सेल्समन म्हणून काम करत होता. तो मार्च २०२४ मध्ये १० दिवस गावी गेल्याने त्याचा मूळ एअरपोर्ट एन्ट्री पास कंपनीने जमा करून घेतला. मात्र त्याच्याकडे सदर पासचा फोटोग्राफ होता आणि त्याच्या मदतीने त्याने बनावट एअरपोर्ट पास तयार केला. त्यानुसार त्याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.