लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. जितेंद्रकुमार सिंग (२३) आणि महिला ईशा छाब्रा (३२), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
...अन् ती लिफ्टपर्यंत पोहोचली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडचा रहिवासी असलेला सिंग हा मंगळवारी सकाळी ९:४५ वाजता खानच्या घराभोवती फिरताना दिसला. अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलिसाने त्याला निघून जाण्यास सांगितले.
आरोपीने रागाच्या भरात त्याचा मोबाइल फोन जमिनीवर फोडला. त्याच सायंकाळी ७:१५ वाजता सिंग त्याच इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या कारचा पाठलाग करून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसला. तो परिसरात प्रवेश करण्यात यशस्वीही झाला; पण पोलिसांनी त्याला पुन्हा पकडले.
सिंग म्हणाला की, त्याला अभिनेत्याला भेटायचे होते. छाब्राने पहाटे ३:३० वाजता असाच प्रयत्न केला आणि अपार्टमेंटच्या लिफ्टपर्यंत पोहोचण्यातही ती यशस्वी झाली, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.