पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: June 23, 2015 01:07 IST2015-06-23T01:07:21+5:302015-06-23T01:07:21+5:30

तरुणांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

Attempt to suicide in the police station | पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई : तरुणांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. त्यानंतर पोलिसांनी शिवाजी देशमुख आणि प्रकाश वाडकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणी व हे तरुण एकाच कंपनीत नोकरी करत होते.
मुलुंड येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने एपीएमसी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला. ती तुर्भे येथील खासगी कंपनीत कामाला आहे. त्याच कंपनीतील दोघे सतत तिची छेड काढत होते. तिचे लग्न ठरलेले असतानाही इतर
तरुणांसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याच्या अफवा पसरवत होते. तिला मेसेज पाठवून त्रास देत होते. त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाची माहिती तिने तिच्या होणाऱ्या
पतीलादेखील दिली. त्याने या तरुणांना दम दिल्यानंतरही छळ सुरूच राहिला. या त्रासाला कंटाळून ती एपीएमसी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी गेली होती.
पोलिसांनी प्रथम तिच्या तक्रारीची गांभीर दखल न घेतल्याचे तिच्या होणाऱ्या पतीने सांगितले. पोलिसांनी काही वेळाने त्या दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावले. तिथेही ते तिच्याकडे पाहून हसत होते. यापूर्वी त्यांनी आपले कोणी काही करू शकत नाही, अशी धमकी तरुणीला दिली होती. त्यामुळे त्यांच्या हसण्यावरून पोलीसही त्यांना पाठीशी घालतील असा अर्थ या तरुणीने लावला आणि सोबत आणलेले बेगॉन पिऊन पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले. आता तिची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर उपआयुक्त शहाजी उमाप, सुरेश मेंगडे, साहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे यांनी रुग्णालयात तरुणीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
तरुणीच्या तक्रारीनुसार एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून त्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याचेही उमाप यांनी सांगितले. तर या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, असे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Attempt to suicide in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.