Join us

पालिका कर्मचा-यांवरील हल्ला सहन केला जाणार नाही; आयुक्तांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 20:29 IST

प्रशासनामार्फत पवई येथे कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात येत होती.

जयंत होवाळ, मुंबई :  पवईतील अतिक्रमणांवर कारवाई करणाऱ्या पालिका  कर्मचारी आणि पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याची गंभीर  दखल मुंबई महापालिका अयुक्य भूषण गगराणी यांनी घेतली असून     कारवाई दरम्यान पालिका कर्मचा-यांवर झालेला हल्ला कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा देतानाच  प्रशासन कर्मचा-यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी दिला. हल्ल्यात जखमी झालेले पालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यांची गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट देवून विचारपूस केली. 

प्रशासनामार्फत पवई येथे कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात येत होती. पवईगाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर सुमारे ५०० झोपड्या असलेली ‘लेबर हटमेंट’ तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आली होती. या झोपड्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य मानव अधिकार आयोगाने पालिका प्रशासनास दिले होते. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५५ नुसार या झोपडपट्टीधारकांना यापूर्वी देखील नोटिसा  देण्यात आल्या होत्या. तसेच, पालिका अधिनियमातील कलम ४८८ तरतुदीनुसार, या झोपड्यांच्या कब्जेदारांना १ जून रोजी कायदेशीर नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. ४८ तासांच्या आत स्वत:हून ही अतिक्रमणे न तोडल्यास प्रशासनाच्यावतीने अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे नोटीसीत नमूद करण्यात आले होते. याचाच अर्थ प्रशासनाने विहित प्रक्रिया पूर्ण केली तसेच आगाऊ सूचना देवून पुरेसा वेळ देखील दिला होता, अशी भूमिका प्रशासनाने मंडळी आहे. अतिक्रमण तोडण्याची कारवाई सुरु असताना स्थाानिक रहिवाशांनी विरोध करत दगडफेक केली. या घटनेत पालिकेचे ५ अभियंते, ५ मजूर व त्यासोबत १५ पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. कायद्याचे पालन कारवाई यापुढे देखील सुरू राहणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :मुंबई