पवई पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST2021-01-13T04:12:11+5:302021-01-13T04:12:11+5:30
पवई पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ट्रिपल सीट मोटारसायकलवरून भरधाव वेगाने ...

पवई पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला
पवई पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला
भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ट्रिपल सीट मोटारसायकलवरून भरधाव वेगाने जात वृद्धेच्या कारला धडक देऊन तिच्याशी हुज्जत घालणाऱ्या तीन तरुणांना पवई पोलिसांनी हटकले. या रागातून त्या पोलिसांवर हल्ला करत त्यांना जखमी करून पसार होणाऱ्या तिघांपैकी एकाला पवई पोलिसांनी ताब्यात घेतले, तर भाजपचा कार्यकर्ता असलेल्या मुख्य आरोपीसह दोघांचा शोध सुरू असून, याप्रकरणी सोमवारी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
हिरानंदानी येथील गॅलरीया सर्कलजवळ हा प्रकार घडला. यातील सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर हे तिघे माेटारसायकलने ट्रिपल सीट भरधाव वेगाने निघाले होते. त्यावेळी त्यांनी एका कारला जोरदार धडक दिली, जी एका साठवर्षीय डॉक्टर महिलेची होती. या अपघातानंतर ते तिघे महिलेशी हुज्जत घालू लागले. भरस्त्यात नागरिकांची गर्दी जमू लागली. गस्तीवर असलेल्या पवई पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जमावाला पांगवून सचिन, दिपू व आयुष यांना रिक्षात बसवून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र काही अंतरावर येताच त्यांनी खैरमोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला चढवला व ते पसार झाले. यात खैरमोडे यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली असून, दोघांनाही मुका मार लागल्याचे पवई पोलिसांकडून सांगण्यात आले.
सचिनला ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य आरोपी तसेच भाजपचा कार्यकर्ता दिपू आणि आयुषचा शोध सुरू आहे. जखमी पोलिसांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
............................