मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला
By Admin | Updated: September 25, 2015 02:47 IST2015-09-25T02:47:49+5:302015-09-25T02:47:49+5:30
सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीतील काही महिला आणि पुरुषांनी समतानगर पोलिसांवर हल्ला करण्याची घटना बुधवारी रात्री घडली.

मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला
मुंबई : सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीतील काही महिला आणि पुरुषांनी समतानगर पोलिसांवर हल्ला करण्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी १६ जणांना अटक केलीे.
कांदिवली पूर्व परिसरातील वडारपाडा येथील हनुमाननगरमधून बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नवतरुण मित्र मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली होती. मात्र त्यात मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावला होता. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोलीस निरीक्षक वायल आणि पोलीस हवालदार धोबी यांनी त्यांना अडवत स्पीकर बंद करण्यास सांगितले. मोठ्याने संगीत वाजविण्याची परवानगी रात्री दहा वाजेपर्यंतच असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. त्यावेळी या मिरवणुकीतील काही लोकांनी या दोघांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी समतानगरच्या महिला पोलीस निरीक्षक सुनयना नटे घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या जमावाने त्यांच्यावरही हल्ला चढविला. याबाबत माहिती मिळताच अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले. येथे नऊ महिला तसेच सात पुरुषांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)