दहा जानेवारीला हल्ला?

By Admin | Updated: January 8, 2015 01:58 IST2015-01-08T01:58:33+5:302015-01-08T01:58:33+5:30

विमानळ उडवून देऊ, असा मजकूर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रसाधनगृहाच्या दारावर लिहिलेला आढळल्याने सर्वत्र सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Attack on January 10? | दहा जानेवारीला हल्ला?

दहा जानेवारीला हल्ला?

पोलिसांकडून तपास सुरू : विमानतळावरील शौचालयाच्या दरवाजावर मजकूर
मुंबई : विमानळ उडवून देऊ, असा मजकूर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रसाधनगृहाच्या दारावर लिहिलेला आढळल्याने सर्वत्र सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा मजकूर लिहिणाऱ्याचा शोध मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखेने सुरू केला आहे. मजकूर लिहिणारा हाती आल्यानंतरच ही धमकी आहे की थट्टा हे स्पष्ट होईल, असे पोलीस सांगतात.
सहार विमानतळावर काल नेहमीप्रमाणे साफसफाई सुरू असताना सफाई कर्मचारी प्रसाधनगृहाच्या दारावर लिहिलेला मजकूर वाचून थबकला. ‘अटॅक बाय इसीस... डेट १० जानेवारी २०१५’ हे वाचून सफाई कर्मचाऱ्याने कर्तव्यावरील सीआयएसएफ जवानाला बोलावून आणले. हा मजकूर दाखवला. या जवानाने तत्काळ वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातली. सीआयएसएफने पुढे ही बाब सहार पोलिसांना कळवली. पोलिसांनी लागलीच गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हा मजकूर लिहिणाऱ्याला पकडण्यासाठी पोलीस विमानतळावरील सीसीटीव्हींचे चित्रण न्याहाळत आहेत. अतिरेकी विमान हायजॅक करू शकतात, असा इशारा नुकताच केंद्रीय गुप्तहेर यंत्रणांनी देऊन सर्वच राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर दरवाजावर लिहिलेला हा मजकूर अत्यंत गांभीर्याने घेतल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून मिळते. विमानतळाच्या सुरक्षाव्यवस्थेत आणखी वाढ केल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

मुंबईवर अतिरेक्यांकडून ड्रोन हल्ले होण्याची शक्यता लक्षात
घेऊन पोलिसांनी २७ जानेवारीपर्यंत शहरात पॅराग्लायडिंग, मायक्रो-लाइट विमान किंवा रिमोटने नियंत्रित होणाऱ्या इतर कुठल्याही उड्डाणावर बंदी घातली आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा ताफा, धार्मिक कार्यक्रम किंवा २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांवर अतिरेकी ड्रोन हल्ले करू शकतात, अशी गुप्तवार्ता मुंबई पोलिसांना मिळाली आहे. या हल्ल्यांद्वारे रक्तपात घडविण्याचा तसेच सामाजिक शांतता भंग करण्याचा डाव असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

 

Web Title: Attack on January 10?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.