‘बॉम्बे हाउस’वर हल्लाबोल

By Admin | Updated: November 9, 2016 06:07 IST2016-11-09T06:07:41+5:302016-11-09T06:07:41+5:30

बॉम्बे हाउस येथे वृत्तपत्र छायाचित्रकारांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ शेकडो छायाचित्रकार आणि पत्रकारांनी मंगळवारी टाटा समूहाच्या बॉम्बे हाउस येथील मुख्यालयावर मूक मोर्चा काढला

Attack on 'Bombay House' | ‘बॉम्बे हाउस’वर हल्लाबोल

‘बॉम्बे हाउस’वर हल्लाबोल

मुंबई : बॉम्बे हाउस येथे वृत्तपत्र छायाचित्रकारांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ शेकडो छायाचित्रकार आणि पत्रकारांनी मंगळवारी टाटा समूहाच्या बॉम्बे हाउस येथील मुख्यालयावर मूक मोर्चा काढला. हुतात्मा चौकातून निघालेल्या या मोर्चादरम्यान छायाचित्रकारांना मारहाण करणाऱ्या ‘टॉप्स’ या खासगी कंपनीला टाटा समूहाने हटवण्याची मागणी करण्यात आली.
याआधी ‘टॉप्स’ कंपनीची हकालपट्टी करण्याची मागणी सर्व संघटनांनी टाटा समूहाकडे केली होती. मात्र मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याने मुंबई प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांतर्गत शेकडो पत्रकार आणि छायाचित्रकार हातावर आणि तोंडावर काळ्या फिती बांधून धडकले. ‘टॉप्सला टाटा करा’, ‘गुंडागर्दी नाही चालणार’ असे विविध संदेश दर्शवणारे फलक पत्रकार आणि छायाचित्रकारांनी हाती घेतले होते. मुंबई प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मुंबई मराठी पत्रकार संघ, बॉम्बे न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशन, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन, बीयूजे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशन आणि ठाणे सिटी रिपोर्टर्स असोसिएशनचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. प्रसारमाध्यमांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाने सुमोटो घेत या प्रकरणाचा अहवाल बुधवारपर्यंत मागवला आहे. कौन्सिलचे सदस्य हरमुसजी कामा हे या प्रकरणी चौकशी करणार आहेत.
दरम्यान, पत्रकारांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांविरोधात संरक्षण कायदा तयार करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब भानुशाली यांनी सांगितले. शिवाय पत्रकार आणि छायाचित्रकारांना मारहाण करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची एकमुखी मागणी उपस्थित पत्रकार आणि छायाचित्रकारांनी केली.


आरोपींचा आकडा सातवर : या मारहाणीप्रकरणी अटकसत्र सुरूच असून मंगळवारी आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. स्वप्निल दिलीप चासकर (२२), प्रवीण रमेश साळुंखे (२९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती एमआरए मार्ग पोलिसांनी दिली. यामध्ये आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Attack on 'Bombay House'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.