एटीएसच्या एसीपींनाही आता दीडपट वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 06:09 IST2017-08-14T06:09:29+5:302017-08-14T06:09:35+5:30
दहशतवाद विरोधी पथकामध्ये (एटीएस), पर्यवेक्षणाचे (सुपरव्हिजन) काम करीत असलेल्या सहायक पोलीस आयुक्त/ उपअधीक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

एटीएसच्या एसीपींनाही आता दीडपट वेतन
मुंबई : दहशतवाद विरोधी पथकामध्ये (एटीएस), पर्यवेक्षणाचे (सुपरव्हिजन) काम करीत असलेल्या सहायक पोलीस आयुक्त/ उपअधीक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पथकातील अन्य अधिकारी-कर्मचाºयांनाही दीडपट पगार मिळणार आहे. त्यांच्या मूळ वेतनाची बॅँड पे व ग्रेड पे याच्या बेरजेच्या ५० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दिली जाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनापासून त्यांना हा भत्ता लागू केला जाणार असल्याचे गृहविभागातील अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
एटीएसमध्ये कार्यरत असलेल्या एसीपी वगळता कॉन्स्टेबलपासून ते विभागाचे प्रमुख अपर महासंचालक दर्जाच्या सर्व अधिकाºयांना मासिक वेतनातून ही रक्कम दिली जाते. पथकाच्या स्थापनेवेळी सहायक आयुक्त दर्जाचे पद नसल्यामुळे, त्याचा यात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून एसीपी दर्जाचे अधिकारी एटीएसमध्ये कार्यरत राहूनही या लाभापासून वंचित होते. त्यामुळे एसीपींनाही त्यांच्या वेतन श्रेणीतील बॅँड व ग्रेड पे मधील एकूण रकमेच्या निम्मी रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात यावी, असा प्रस्ताव एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला गृहविभागाकडे पाठविला होता. त्याला आता राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.