एमडी तस्करी प्रकरणात एटीएसने घेतला चिंकू पठाणचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:10+5:302021-02-05T04:28:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एमडी तस्करी प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग ...

एमडी तस्करी प्रकरणात एटीएसने घेतला चिंकू पठाणचा ताबा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एमडी तस्करी प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेज नसरुल्ला खान ऊर्फ चिंकू पठाण (वय ४०) याचा ताबा घेत, त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एटीएसने एमडी तस्करी प्रकरणात दाखल गुन्ह्यात सोहेल सागीरअली सैय्यद (वय ३४) आणि झिशान आरिफ मेमन (३२) यांना अटक केली होती. याच गुन्ह्यात पठाण हा आरोपी होता. एनसीबीने डोंगरीतील एमडी कारखाना उद्ध्वस्त करत पठाणला घणसोली येथून अटक केली. संघटित गुन्हेगारी टोळीच्या मदतीने त्यांचा हा अवैध धंदा अनेक वर्षे सुरू होता. तो दाऊदचा नातेवाईक असून करीम लाला याच्याशीही त्याचे नातेसंबंध आहेत. एमडी विक्रीसाठी त्याने दक्षिण मुंबईतील विशेषत: डोंगरी, नागपाडा, जेजे मार्ग परिसरात वास्तव्य करणाऱ्या, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आणि दाऊद किंवा करीम लाला यांच्याशी संबंधित व्यक्तींना आपल्या टोळीत सहभागी करून घेतल्याची माहितीही एनसीबीच्या हाती लागली आहे.
तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईतील ड्रग्ज विक्रीतून दहशतवादासाठी हवाला मार्गे फंडिंग करत असल्याची धक्कादायक माहिती एनसीबीच्या चौकशीत समोर आली आहे. गेल्या ५ वर्षांत हस्तकांनी तब्बल १५०० कोटींचे ड्रग्ज विकले आहेत. त्यात, पठाणच्या डायरीतूनही अनेक सेलिब्रिटी, उद्योजक मंडळींची नावे एनसीबीच्या हाती लागली. दरम्यान, पठाण याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने त्याला ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
एटीएसने ३० जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने पठाणचा ताबा घेत, त्याच्याकडे चौकशी केली. एटीएसच्या दाखल गुन्ह्यांत सहभाग स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार एटीएसचे पथक अधिक तपास करत आहे.