Join us

आंबा देण्याचे आमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 02:52 IST

घराबाहेर खेळत असलेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीला आंबा देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये घडली.

मुंबई : घराबाहेर खेळत असलेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीला आंबा देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये घडली. या प्रकरणी बाबुलकुमार धरमिंदर यादव (२५) याला दादर पोलिसांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केली आहे.वरळी परिसरात ६ वर्षांची चिमुरडी कुटुंबीयांसोबत राहते. ३० मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीडित मुलगी चौपाटीवर खेळत होती. त्याच दरम्यान यादवची नजर तिच्यावर पडली. त्याने तिला आंबा देण्याचे आमिष दाखवून एका मंदिराच्या मागील निर्जनस्थळी नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास गळा कापण्याची धमकी दिली. या घटनेमुळे मुलगी घाबरली होती.भीतीने तिने कुणालाही काही सांगितले नाही. तिने रडत रडत घर गाठले. मुलीच्या बदललेल्या हालचालींमुळे कुटुंबीयही चिंतेत पडले. ३१ मे रोजी तिला विश्वासात घेऊन कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा तिने यादवच्या अत्याचाराला वाचा फोडली. कुटुंबीयांनी तिच्यासह दादर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत यादवविरुद्ध पॉक्सो, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :गुन्हे