अस्थमा नियंत्रणात ठेवणे आवश्यक

By Admin | Updated: May 6, 2015 02:00 IST2015-05-06T02:00:52+5:302015-05-06T02:00:52+5:30

अस्थमा अ‍ॅलर्जीक आजार आहे. एखाद्या व्यक्तीला अस्थामा झाल्यावर तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. पण, निश्चितच त्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते.

Asthma needs to be controlled | अस्थमा नियंत्रणात ठेवणे आवश्यक

अस्थमा नियंत्रणात ठेवणे आवश्यक

मुुंबई : अस्थमा अ‍ॅलर्जीक आजार आहे. एखाद्या व्यक्तीला अस्थामा झाल्यावर तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. पण, निश्चितच त्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. अस्थमावर नियंत्रण ठेवल्यास आजार बळावत नाही आणि ती व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकते. अस्थमा होण्यामागचे कारण शोधून त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
५ मे हा जागतिक अस्थमा दिन म्हणून पाळला जातो. मुंबईतील दूषित हवा, बदलते हवामान, मोठ्या प्रमाणात होणारी बांधकामे या परिस्थितींमध्ये अस्थमा रुग्णांचा त्रास वाढतो. यामुळे मुंबईतील अस्थमाच्या रुग्णांना जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे. अस्थमाचा रुग्ण वेळच्या वेळी औषधे घेत असला तरीही धुळीचे कण, धूर, फुलांचे परागकण, थंड हवामान, पित्त, मानसिक ताण, व्यायाम, धूम्रपान अशा गोष्टी अस्थमा बळावण्यास कारणीभूत ठरतात, असे मुलुंडच्या कामगार रुग्णालयातील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. स्वप्निल कुलकर्णी यांनी सांगितले.
डॉ. कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे अशी लक्षणे वारंवार आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तपासणी झाल्यावर अस्थमा अथवा अन्य श्वसनविकार आहे का? हे स्पष्ट होते. अस्थमा असल्यास त्या व्यक्तीने विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. कोणत्या कारणामुळे अस्थमा झाला आहे, हे लक्षात घेऊन शक्य तितके त्या वस्तूपासून लांब राहिले पाहिजे. प्रदूषित भागांमध्ये जाणे कटाक्षाने टाळले पाहिजे. व्यायाम करण्याआधी इन्हेलरचा वापर केला पाहिजे. जास्त प्रमाणात व्यायाम करू नये. नियमित तपासणी करून औषधे घेतली पाहिजेत.
अस्थमा पाळीव प्राण्यांमुळे (कुत्रा, मांजर) बळावतो. यामुळे या प्राण्यांना ज्या ठिकाणी झोपतो तिथे प्रवेश देऊ नये. आठवड्यातून एकदा तरी पाळीव प्राण्यांना आंघोळ घातली पाहिजे. आईपासून बाळाला अस्थमा होण्याचा धोका असल्यामुळे गर्भवती महिलेने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
गर्भवती महिलेने अथवा तिच्या पतीने धूम्रपान करू नये. अस्थमा नक्की कोणत्या कारणामुळे झाला आहे हे शोधणे आवश्यक असते. काही जणांना खाण्याच्या रंगाचा त्रास होतो, अशा व्यक्तींना खाण्याचा रंग टाळला पाहिजे. अस्थमा झाल्यावर नियमित औषधे घेऊन दर २ ते ३ महिन्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे, असे सायन रुग्णालयाच्या श्वसनविकार विभागाचे प्रमुख डॉ. नीळकंठ आवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

अस्थमा झाल्यावर काय होते?

> अस्थमा झालेल्या व्यक्तींची श्वसननलिका अतिसंवेदनशील होते. श्वसननलिकेला सूज आल्याने आकुंचन पावते. यामुळे हवा आत जाऊन बाहेर सोडण्यास त्रास होतो. यामुळे या व्यक्तींना परफ्युम, इतर सुगंधांचादेखील त्रास होतो. सामान्य व्यक्तीला या गोष्टींचा त्रास होत नाही.

Web Title: Asthma needs to be controlled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.