बंदोबस्तासाठी माजी सैनिकांसह सेवानिवृत्त पोलीस अधिका-यांची घेणार मदत
By Admin | Updated: September 27, 2014 00:19 IST2014-09-27T00:19:27+5:302014-09-27T00:19:27+5:30
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुका सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

बंदोबस्तासाठी माजी सैनिकांसह सेवानिवृत्त पोलीस अधिका-यांची घेणार मदत
ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुका सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिक व सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचीदेखील मदत घेतली जाणार आहे. विशेष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा व पालघर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त केला जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासह निर्भय व शांततेच्या वातावरणात मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी तैनात पोलिसांना हातभार लावण्यासाठी विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. यासाठी माजी सैनिक व सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
या मदतीसाठी ३५ ते ६५ वयोमर्यादा असलेल्या माजी सैनिकांसह सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
या विशेष पोलीस अधिकारीपदी निवड झालेल्यांना शासकीय नियमानुसार मानधन व प्रशस्तीपत्र दिले जाणार असल्याचे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेश प्रधान व पालघर पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितले. यासाठी इच्छुक माजी सैनिकांसह सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी ०२२-२५३९५१५१, २५३९५१५१ येथे संपर्क साधून आपली नावे तत्काळ नोंदवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)