Join us

मालाडमधील गावठणांचा विकास आराखड्यात समावेश करा, आ. अस्लम शेख यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 09:18 IST

मुंबईतील गावठणासाठी नवीन पॉलिसी तयार करा

मनोहर कुंभेजकर

मुंबई - स्वातंत्र्याच्या 71 वर्षांनंतरही मालाड पश्चिम विधानसभेतील मढ, भाटी, एरंगळ, आक्सा, मालवणी, मार्वे, मनोरी, खारोडी, धारीवली, राठोडी ही गावठाणे विकासापासून दुर्लक्षितच आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील या विभागात साध्या सुविधा नाहीत. तर मढ व मनोरी येथेपालिकेचे हॉस्पिटल नाही. तसेच पालिकेच्या नव्या विकास आराखड्यात या गावठणाचा समावेश करण्यात आलेला नाही.

मढ, भाटी, एरंगळ, आक्सा, मालवणी, मार्वे, मनोरी, खारोडी, राठोडी, धारीवली ही गावठणे पालिकेच्या सुधारित विकास आराखड्यात तरी समाविष्ट करण्यात यावीत अशी आग्रही मागणी मालाड पश्चिम येथील काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. येथील भूमिपुत्र असलेला कोळी समाज हा पिढ्यानपिढ्या येथे मासे सुकवतो, मात्र त्यांच्या मासे सुकवण्याच्या असलेल्या जागांचा या विकास आराखड्यात समावेश नाही.

भाटी कोळीवाड्यात 100 वर्षे जुनी स्मशानभूमी आहे. त्यावर गेल्या काही महिन्यांपूर्वी पालिका व उपनगर जिल्हाधिकाती हातोड मारायला आले होते, अशी माहिती आमदार अस्लम शेख यांनी दिली. विकास आराखड्यात ही गावठणे नसल्यामुळे गेली शेकडो वर्षे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या या भूमिपूत्रांना त्यांची घरे विकसित करता येत नाही आणि जर कुटुंब मोठी झाल्यामुळे त्यांनी विकसित केल्यास पालिका प्रशासन त्यांच्या घरावर हातोडा मारते. 2011 पर्यंतच्या झोपडपट्टीवासियांना शासन मान्यता देते, मात्र या भूमिपुत्रांवर अन्याय करते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मालाडसह मुंबईतील गावठणासाठी शासनाने एक नवीन पॉलिसी तयार करा अशी मागणी आपण अनेकवेळा मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. आज जर ही गावठणे विकास आराखड्यात समाविष्ट केली नाही तर 2034 च्या विकास आराखड्यापर्यंत त्यांना वाट बघावी लागेल आणि ती विकासापासून वंचित राहतील आणि पालिकेचे भविष्यात येणारे नवीन प्रकल्प व योजनांचा या गावठणाना लाभ मिळणार नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात हा महत्वाचा मुद्दा आपण पोटतिडकीने मांडून शासनाचे लक्ष वेधले अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलतांना दिली. 

टॅग्स :मुंबई