Join us  

'MPSC च्या प्रश्नपत्रिकेवर भूमिका मांडली, गोरगरीबांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरही प्रश्न विचारा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 1:21 PM

MPSC च्या परीक्षेतून भाजपाधार्जिणा प्रचार होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. 25 मार्च रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा संदर्भ देत, या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून काँग्रेसविरोधी भूमिका रुजविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केलाय

ठळक मुद्देMPSC च्या परीक्षेतून भाजपाधार्जिणा प्रचार होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. 25 मार्च रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा संदर्भ देत, या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून काँग्रेसविरोधी भूमिका रुजविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकूर

मुंबई - एमपीएससी परीक्षेतील प्रश्नावरुन महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एमपीएससी परीक्षेतून होणारा भाजपधार्जिणा प्रकार रोखा, अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केलीय. मात्र, MPSC प्रश्नपत्रिकेबद्दल बोलणाऱ्या मंत्री महोदया MPSC पास उमेदवारांच्या नियुक्तीबद्दलही प्रश्न विचारतील का? असा सवालच एका भावी अधिकाऱ्याने विचारलाय.   

MPSC च्या परीक्षेतून भाजपाधार्जिणा प्रचार होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. 25 मार्च रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा संदर्भ देत, या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून काँग्रेसविरोधी भूमिका रुजविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केलाय. यासंदर्भातील भूमिका मांडताना एक व्हिडिओही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. यशोमती ठाकूर यांचा हा व्हिडिओ शेअर करत, मंत्री महोदयांनी MPSC पास परंतु अद्यापही नियुक्ती न देण्यात आलेल्या उमेदवारांचाही प्रश्न मांडावा, असे महेश पांढरे या ट्विटर युजर आणि एसमीएससी परीक्षा पास उमेदवाराने विचारले आहे. 

2020 च्या MPSC च्या CSAT मधील उतारा यावर आपण भूमिका मांडली, पण अतिशय कष्ट करून तळागाळातील गोरगरीबांची पोरं ही परिक्षा उत्तीर्ण होऊन 10 महिने झाले तरी अजून नियुक्त्या मिळाल्या नाहीत, यासाठी या तरुण वर्गाची बाजू घेणार का?, असा सवाल महेश यांनी विचारला आहे.   

काही दिवसांपूर्वीच मिळाले आश्वासन

नायब तहसीलदार बनलेल्या पण नियुक्तीमुळे शेतात राबणाऱ्या प्रवीण कोटकर यांनीही काही दिवसांपूर्वी ट्विट करुन हा विषय सरकारसमोर मांडला होता. एमपीएससी परीक्षा दिलेल्या 2020 च्या बॅचमधील तब्बल 413 भावी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न रखडला आहे. 8 वर्षे 'स्पर्धा' परीक्षेचा संघर्ष करुन मिळवलेल्या पदाची नियुक्ती 10 महिन्यांपासून रखडलीय. त्यामुळे, कुणाला तोंड लपवून घरातच बसावं लागतंय, तर कुणी स्वत:च्याच शेतात शेतमजूर बनला, अशी दयनीय परिस्थिती या भावी अधिकाऱ्यांची आहे. विशेष म्हणजे प्रवीण कोटकर यांना काही दिवसांपूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही मिळाले होते, पण तेही केवळ आश्वासनच राहिले.  

2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला

एमपीएससी परीक्षेसाठी 2018 ला राज्यसेवेची जाहिरात आली. त्यानुसार, फेब्रुवारी 2019 साली पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर, जुलै 2019 मुख्य परीक्षा, मुख्य परीक्षेच्या निकालानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये संबंधित पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीनंतर 19 जून 2020 रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. 2 वर्षांपासून अडथळ्यांची शर्यत पार करुनही अद्याप 'वेट अँड वॉच' 

MPSC प्रमाणेच तलाठी पदाच्या नियुक्त्याही रखडल्या      

राज्यात तलाठी या क वर्गातील पदासाठी मार्च 2019 मध्ये परीक्षा झाली होती, डिसेंबर महिन्यात परीक्षेचा निकाल लागला. जानेवारी महिन्यात 27 जिल्ह्यांतील उमेदवारांना नियुक्त्याही दिल्या. पण, प्रशासकीय दिरंगाई आणि शासन दुर्लक्षामुळे नांदेड, बीड, औरंगाबाद, सातारा, सोलापूर आणि विदर्भातील 2 अशा एकूण 7 जिल्ह्यातील जवळपास 350 उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. एकाचवेळी परीक्षा दिलेल्या 27 जिल्ह्यात अद्यापही निुयक्त्या झाल्या, पण 7 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर नियुक्ती नसल्याने अन्याय होत आहे. 

टॅग्स :यशोमती ठाकूरएमपीएससी परीक्षामुंबईभाजपा