Join us
Daily Top 2Weekly Top 5

एशियाटिक सोसायटीची निवडणूक अखेर स्थगित;धर्मादाय आयुक्तांकडून निरीक्षकाची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 06:03 IST

गेल्या तीन महिन्यांपासून पुढे ढकलली गेलेली ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून पुढे ढकलली गेलेली ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या निवडणुकीसंदर्भात धर्मदाय आयुक्तांपुढे शुक्रवारी सुनावणी झाली आणि या सुनावणीअंती धर्मदाय आयुक्तांनी या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. ही निवडणूक शनिवारी (दि. १४) होणार होती. ‘एशियाटिक’ची निवडणूक स्थगित होण्याची ही दुसरी वेळ आहे.

प्राप्त माहितीनुसार, धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या निरीक्षकांच्या मदतीने व्यवस्थापन मंडळातील पाच सदस्यांची उपसमिती यापुढे संस्थेचा दैनंदिन कारभार पाहणार आहे. निवडून आलेली व्यवस्थापन समिती स्थापन होईपर्यंत, एशियाटिक सोसायटीचा कारभार के. डी. तलोकर हे निरीक्षक आणि व्यवस्थापन समितीचे मंदार भारदे, विवेक गणपुले, कुमार केतकर, सुरेंद्र कुलकर्णी आणि सूरज पंडित यांच्या समितीद्वारे चालविला जाईल. 

मात्र, कुमार केतकर आणि विवेक गणपुले हे उमेदवार असल्याने त्यांना मतदार यादी तयार करण्याचे काम करता येणार नाही. निरीक्षक के. डी. तलोकर व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच मंदार भारदे, सुरेंद्र कुलकर्णी आणि सूरज पंडित यांची उपसमिती मतदारांची यादी तयार करणार आहे. समिती दोन महिन्यांत पात्र मतदारांची यादी तयार करील. त्यावरील हरकतींची १५ दिवसांत सुनावणी घेईल आणि वैध मतदार याद्या तयार करण्यात येतील, असा कार्यक्रम धर्मदाय आयुक्त यांनी निकालपत्रामध्ये दिला आहे.

मतदार याद्या तयार झाल्यानंतर महिन्याच्या आत निरीक्षक के. डी. तलोकर यांच्या निरीक्षणाखाली निवडणुका होतील. उपसमितीला नवीन अर्ज स्वीकारण्यास मनाई केली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रा. विस्पी बालापोरिया या अध्यक्षपदी व प्रा. शहरनाझ नळवाला या उपाध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या पात्रतेच्या मुद्द्यावर बालापोरिया-नळवाला यांचा बदल अहवाल (चेंज रिपोर्ट) धर्मादाय आयुक्तांनी फेटाळला होता. परिणामी बालापोरिया व नळवाला यांच्या व्यवस्थापन मंडळाला सदस्यत्व मंजूर करण्याचा अधिकार नव्हता, असे धर्मदाय आयुक्त यांनी स्पष्ट केले.

पत्रकार, लेखक, प्राध्यापक आमनेसामने

दरम्यान, या निवडणुकीमध्ये कुमार केतकर विरुद्ध विनय सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार, लेखक, प्राध्यापक आमनेसामने उभे आहेत. केतकर यांच्या पॅनलमध्ये कुमार केतकर यांच्यासह प्रा. ए. डी. सावंत, अर्जुन डांगळे, प्रा. दीपक पवार, सुनील कदम, सी. एम. पॉलसिल, भरत गोठोसकर, इब्राहिम अफगाण, डॉ. कुंदा. प्र. नी., नंदिनी आत्मसिद्ध, सुनंदा भोसेकर, स्वाती दाते आणि छाननी समितीमध्ये अनिल सावंत लढत आहेत; तर, सहस्रबुद्धे यांच्या पॅनलमध्ये डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यासह रमेश पतंगे, डॉ. संजय देशमुख, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, डॉ. निवेश भारद्वाज, विवेक गणपुले, डॉ. मोघे, डॉ. मल्हार कुलकर्णी, मधिव भांडारी, ॲड. राजेश बेहेरे, व्ही. एम. चक्रवर्ती, प्रमोद बापट आणि छाननी समितीमध्ये डॉ. माधवी नरसाळे, दत्ता पांचवाघ, अभिजित मुळ्ये, स्नेहा नगरकर, मल्हार गोखले, अमोल जाधव, उमंग काळे यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Asiatic Society Election Postponed; Charity Commissioner Appoints Observer

Web Summary : The Asiatic Society of Mumbai's election is postponed again following a Charity Commissioner hearing. An observer and a five-member subcommittee will manage affairs until a new committee is formed. A voter list will be prepared within two months, with elections following shortly after.
टॅग्स :मुंबई