एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचा हलगर्जीपणा ?

By Admin | Updated: November 19, 2015 02:25 IST2015-11-19T02:25:47+5:302015-11-19T02:25:47+5:30

विदर्भातील व्यावसायिक सुभाष लुंकड (६२) यांचा मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला, असा आरोप लुंकड यांच्या नातेवाईकांनी केला आहे. लुंकड यांची

Asian Heart Institute's Neglect? | एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचा हलगर्जीपणा ?

एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचा हलगर्जीपणा ?

मुंबई: विदर्भातील व्यावसायिक सुभाष लुंकड (६२) यांचा मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला, असा आरोप लुंकड यांच्या नातेवाईकांनी केला आहे. लुंकड यांची प्रकृती स्थिर नसताना ती माहिती लपविल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
६ नोव्हेंबरला लुंकड यांच्यावर एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरही सुभाष लुंकड यांचा ‘हार्ट पंपिंग रेट’ वाढलेला नव्हता, असे असूनदेखील त्यांना डिस्चार्ज देताना सर्व तपासण्या नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ‘हार्ट पंपिंग रेट’ विषयी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ही माहिती दिली असती, तर पुढील उपचारांचा निर्णय घेता आला असता, असे त्यांची कन्या श्वेता संचेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लुंकड यांना हृदयविकार होता. सुरुवातीला नागपूरमध्ये डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले. बायपास सर्जरीसाठी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. ६ नोव्हेंबरला लुंकड यांच्यावर बायपास (ग्राफ्टिंग) सर्जरी करण्यात आली. सामान्यत: ग्राफ्टिंग करताना हाताच्या अथवा पायाच्या नसा वापरल्या जातात, पण शस्त्रक्रियेपूर्वी बायपाससाठी हृदयाच्या नसा वापरण्यात येतील, असे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर त्यांना १० दिवस रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. १६ नोव्हेंबरला टू डी इको, इसीजी, एक्सरे या तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी सर्व तपासण्या नॉर्मल असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आल्याचे श्वेता संचेती यांनी सांगितले.
लुंकड यांना १७ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजता डिस्चार्ज देण्यात आला. रात्रीपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. १८ नोव्हेंबरला पहाटे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना हिरानंदानी रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्यांना कार्डिअ‍ॅकचे प्राथमिक उपचार दिले, पण
सुभाष यांचा ‘कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट’मुळे मृत्यू झाला. त्यावेळी डॉक्टरांनी ‘हार्ट पंपिंग रेट’ वाढला नसल्याचे स्पष्ट केले. तोपर्यंत आपल्याला याची काहीच कल्पना नव्हती. लुंकड
यांना काही दिवस देखरेखीखाली ठेवायला हवे होते, असेही श्वेता यांचे म्हणणे आहे. ‘बायपासनंतर अतिदक्षता विभागाचे डॉक्टर आमच्याशी बोलत होते. तेव्हा प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले. डिस्चार्जवेळी ज्युनिअर डॉक्टरांनी आमच्याशी संवाद साधला, पण ‘हार्ट पंपिंग रेट’ कमी असल्याविषयी आम्हाला अंधारात ठेवले, असेही श्वेता यांचे म्हणणे होते. (प्रतिनिधी)


‘आम्ही शर्थीचे प्रयत्न केले’
‘लुंकड यांना जेव्हा एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये आणण्यात आले, तेव्हा त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. ज्या डॉक्टरांनी त्यांना आमच्याकडे पाठविले, त्यांनीदेखील लुंकड यांची शारीरिक परिस्थिती नाजूक असल्याचे म्हटले होते. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशनही त्यावेळी केले होते. शस्त्रक्रियेत धोका अधिक असून, यशस्वीतेची शक्यता कमी असल्याचेही आम्ही स्पष्ट केले होते. कुटुंबीयांनीही जोखीम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने, आम्ही शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले.

शस्त्रक्रियेनंतर १० दिवस उपचार करून त्यांना स्थिर करून घरी सोडण्यात आले होते. आज सकाळी त्यांना अर्थेमिया उद्भवला. या अवस्थेतील रुग्णांना अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर त्यांना घराजवळ असलेल्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला,’ असे एशिअन हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे सांगण्यात आले.

Web Title: Asian Heart Institute's Neglect?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.