Join us  

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण, प्रदीप घरत वकीलपत्र सोडण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 6:09 AM

अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला चालविणारे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारकडून योग्य मानधन मिळत नसल्याने वकीलपत्र सोडण्याची तयारी दर्शविली आहे.

पनवेल - अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला चालविणारे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारकडून योग्य मानधन मिळत नसल्याने वकीलपत्र सोडण्याची तयारी दर्शविली आहे. १७ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान घरत अनुपस्थित राहिले. या सर्व प्रकरणासंदर्भात अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.सरकारी वकील प्रदीप घरत यांना मागील दहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. अशा परिस्थितीत घरत यांनी संबंधित खटल्याचे वकीलपत्र सोडण्याचा इशारा दिला आहे. घरत हे संबंधित खटला उत्तमरीत्या लढला असल्याने त्यांनी वकीलपत्र सोडल्यास त्याचा परिणाम खटल्यावर होणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. या प्रकरणात अद्याप तपासाची गरज आहे. याकरिता संगीता अल्फान्सो यांच्याकडे तपास सोपविल्यास या खटल्यातील आणखीन पुरावे बाहेर येतील. याव्यतिरिक्त जेव्हा आरोपी अभय कुरुंदकरवर गुन्हा दाखल झाला त्या वेळेला सुमारे दहा महिने कुरुंदकर सुट्टीवर होता. या दरम्यान कुरुंदकर रजेवर होता का? त्याची रजा कोणी मंजूर केली आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.वर्षभरापासून ते माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने या सर्व प्रकरणाची माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. अजित पवार यांना या प्रकरणाचीसर्व माहिती असून विधानसभेतही त्यांनी प्रश्न उपस्थितकेला होता. पनवेल सत्र न्यायालयात पुढील सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे.

टॅग्स :न्यायालयमुंबईगुन्हेगारी