Join us  

कारशेड प्रकरण भोवलं? अश्विनी भिडेंना मेट्रो-3 च्या प्रकल्पावरुन हटवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 8:50 PM

मेट्रो कारशेडवरुन शिवसेनेविरोधात घेतलेली भूमिका भोवल्याची चर्चा

मुंबई: राज्यातील ठाकरे सरकारनं सनदी अधिकारी अश्विनी भिडेंना मेट्रो-3 च्या संचालक पदावरुन हटवलं आहे. त्यांच्या जागी रणजितसिंह देओल यांची नेमणूक करण्यात आली आहे. भिडे यांचा मेट्रो-3 च्या संचालक पदाचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण झाला होता. मात्र त्यांना सरकारकडून कार्यकाळ वाढवून देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता भिडे यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. डिसेंबरअखेरीस ठाकरे सरकारनं अश्विनी भिडेंना प्रधान सचिवपदी बढती दिली. याशिवाय एमएमआरसीएल आणि मेट्रो-3 चं संचालकपदही त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलं. आरे येथील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरून अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. मात्र तरीही भिडे यांना पदोन्नती देण्यात आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र आज ठाकरे सरकारनं २० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. सरकारनं मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रणजीतसिंह देओल यांची नेमणूक केली आहे. देओल यांच्याकडे सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार आहे.मुंबईतील आरे कारशेडमधील वृक्षतोडीवरून वाद झाल्यानंतर मेट्रो-3 च्या संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांना शिवसेनेनं लक्ष्य केलं होतं. आरे येथील कारशेड अन्यत्र हलवल्यास प्रकल्पच होणार नसल्याची भूमिका मेट्रो प्रशासनानं घेतली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडेंवर जोरदार टीका केली होती. 'अश्विनी भिडे व त्यांच्या अन्य अधिकाऱ्यांना ‘आरे’च्या कारशेडशिवाय मेट्रो प्रकल्प पूर्ण करता येणार नसेल, तर अशा अधिकाऱ्यांना बाजूला करावं. त्यांच्या जागी सक्षम व मुंबईकरांना विश्वासात घेऊन काम करणाऱ्यांकडे प्रकल्प द्यावा, अशी मागणीही आदित्य यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. 

टॅग्स :मेट्रो