ड्रमच्या आधारावर बाळाला कुशीत घेवून तरंगत होता; हातून थोरला निसटला अन् पत्नीनेही गमावले प्राण
By मनीषा म्हात्रे | Updated: December 20, 2024 05:50 IST2024-12-20T05:48:49+5:302024-12-20T05:50:38+5:30
माझ्या हाती एक प्लास्टिक ड्रम लागला. त्याच्या आधारावर मी तरंगत असताना पत्नीच्या हातून मोठा मुलगा निसटताना पाहिला आणि काही वेळाने तीही दिसेनाशी झाली.

ड्रमच्या आधारावर बाळाला कुशीत घेवून तरंगत होता; हातून थोरला निसटला अन् पत्नीनेही गमावले प्राण
मनीषा म्हात्रे, मुंबई: गोव्याहून मुंबई दर्शनासाठी आलेल्या अशरफ पठाण पत्नी आणि दोन मुलांसह गेट वे ऑफ इंडिया येथे आले. दहा महिन्यांच्या बाळाच्या कुशीत घेवून बाहेरचा नजारा दाखवत असतानाच बोट कोसळली. हाती लागलेल्या एका प्लास्टिक ड्रमचा आधार घेत ते तरंगत राहिले. दुसरीकडे पत्नी शफीनासोबत असलेला दुसऱ्या मुलाचा हात निसटला. काही क्षणातच हसत खेळत कुटुंब नीलकमल बोट दुर्घटनेत उद्ध्वस्त झाले.
मूळचे गोव्याचे रहिवासी असलेले अशरफ पठाण यांचा टेक्सटाइलचा व्यवसाय आहे. कुटुंबाच्या आनंदासाठी ते गोव्याहून मुंबईत आले. पत्नी शफिना, सात वर्षाचा मुलगा जोहान आणि १० महिन्याचा अझान यांच्यासह एकत्र गेट वे हून एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या बोटीत होते. मोठा मुलगा पत्नीसोबत तर अझान त्यांच्या कुशीत होता. दोघेही मुलांसोबत प्रवासाचा आनंद लुटत असताना ही दुर्घटना घडली. पठाण यांच्या म्हनण्यानुसार, कुटुंब आनंदात होतं. मी बाळाला कुशीत घेऊन पक्षी, समुद्र दाखवत असतानाच अचानक बोटीला दुसरी बोट धडकल्याने बोटीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. आम्ही वरून खाली लाईफ जॅकेट घेण्यासाठी आलो. लाईफ जॅकेट कमी होते. मी बाळासह वर डेकवर आलो. गर्दीमुळे पत्नी, मुलासह खालीच अडकली. अवघ्या काही मिनिटातच बोट बुडाली. माझ्या हाती एक प्लास्टिक ड्रम लागला. त्याच्याच आधारावर लटकून होतो.
दुसरीकडे कुशीतल्या बाळाचा हंबरडा. ड्रममध्ये शिरणारे पाण्याने धाकधूक वाढवली. अखेर, ३० मिनिटांनी नौदलाची बोट दिसली. आणि सुटकेचा निःश्वास टाकला. आणखीन पाच मिनिटांचा उशीर झाला असता तर ड्रमही बुडून दोघांचा जीवावर बेतला असता असे पठाण यांनी सांगितले. दोघांना जेएनपीटी येथे आणण्यात आले. तेथे पोहचताच पत्नी आणि मुलाचा शोध सुरू असताना पत्नीचा मृतदेह हाती लागला. मात्र मुलाचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. चिमुकल्याला कुशीत घेवून ७ वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे.
बहिणीच्या लग्नाचे स्वप्न अपुरे...
बहिणीच्या लग्नाच्या खरेदीसाठी बिहारहून मोहम्मद रेहमान कुरेशी मुंबईत आला होता. बहिणीचे २७ डिसेंबरला लग्न असल्याने तो मालकासोबत कपडे खरेदीला आला होता. त्याने प्रवासादरम्यान बोटीवरील सेल्फी कुटुंबीयांना पाठवल्यामुळे तो या बोटीवर असल्याचे कुटुंबीयांना समजले. या घटनेने लग्न सराईच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जोहान कुठे असेल?
आम्हा दोघा बाप-लेकांना जेएनपीटी येथे आणण्यात आले. तेथे पोहोचताच पत्नी आणि मुलगा कुठे असेल चिंता सतावू लागली. तेवढ्यात पत्नीचा मृतदेह सापडल्याचा धक्का बसला. मुलगा जोहानचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे, असे पठाण यांनी सांगितले.