भाजपा सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे : अशोक चव्हाण

By Admin | Updated: June 8, 2017 19:32 IST2017-06-08T19:32:37+5:302017-06-08T19:32:53+5:30

मध्य प्रदेश पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली

Ashok Chavan, the leader of the BJP government, goes to dictatorship | भाजपा सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे : अशोक चव्हाण

भाजपा सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे : अशोक चव्हाण

>ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 8 -  मध्य प्रदेश पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली. ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असून भाजपा सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे सुरु आहे अशी घणाघाती टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या कृतीचा निषेध करून निदर्शने केली. यावेळी बोलताना चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
 
भाजपा सरकारच्या काळात सीमेवर जवान मरत आहेत आणि देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत. भाजपा सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे देशात रोज शेतकरी आत्महत्या करित आहेत. महाराष्ट्रात साडेनऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या शेतक-यांनी सरकारच्या विरोधात संप पुकारला आहे. त्याला प्रतिसाद देत मध्यप्रदेशातल्या शेतक-यांनीही संप पुकारला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनातील काही लोकांना हाताशी धरून शेतक-यांचा संप फोडण्याचा प्रयत्न केला तर शेतक-यांचे आंदोलन दडपण्यासाठी मध्य प्रदेशातल्या भाजप सरकारने पोलिसांवर गोळीबारांचे आदेश दिले या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातले भाजप नेते हमीभाव मागणा-या शेतक-यांना  शिवीगाळ करून चालते व्हा असे म्हणत आहेत शेतकरी संपावर गेले तरी आमचे काही बिघडत नाही असे भाजप प्रवक्ते म्हणत आहेत यावरून या सरकारला शेतक-यांविषयी संवेदना नाहीत हे स्पष्ट झाले होते. पण मध्यप्रदशातील घटनेनंतर भाजप सरकारचे वागणे हे जनरल डायर सारखेच आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सरकारने गोळ्या घालून ठार केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांना अटक करून भाजप सरकारने आपला हुकुमशाही चेहरा दाखवला आहे. लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम भाजप सरकारने केले असून देशात हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या शेतकरीविरोधी सरकारविरोधात सुरु केलेला लढा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणखी नेटाने पुढे नेईल शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही अटकच नाही तर गोळ्या झेलायलाही तयार आहोत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
 
यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, हमी भाव मागणा-या शेतक-यांना भाजप सरकार गोळ्या घालते आहे. राहुल गांधींना अटक करून सरकारने आपला फॅटिस्ट चेहरा समोर आला आहे काँग्रेस पक्ष भाजप सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाही शेतक-यांसाठीचा आपला संघर्ष सुरुच ठेवेल असे निरूपम म्हणाले.
 
 

Web Title: Ashok Chavan, the leader of the BJP government, goes to dictatorship