Join us  

Ashish Shelar :"... या बदनामीपासून तुम्हीच आता वाचायला हवे", आशिष शेलारांची महापौर किशोरी पेडणेकरांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 9:00 PM

Ashish Shelar : सार्वजनिक आयुष्यात नितिमूल्य आणि नितिमत्ता पाळणारा मी आहे, शिवसेनेसारखा पाखंडी आणि खोटे पसरवणारा नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

मुंबई : वरळीतल्या घटनेनंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याची चर्चा होती. मात्र, याबाबत स्वत: आशिष शेलार यांनी आपण आक्षेपार्ह विधान केलेले नाही. ना कोणत्या महिलांबद्दल, ना महापौरांबद्दल. माझी संपूर्ण पत्रकार परिषद न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही, ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे म्हटले आहे.

आशिष शेलार म्हणाले, "मी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. ना कोणत्या महिलांबद्दल, ना महापौर महोदयांबद्दल. माझी संपूर्ण पत्रकार परिषद न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही, ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक आयुष्यात नितिमूल्य आणि नितिमत्ता पाळणारा मी आहे, शिवसेनेसारखा पाखंडी आणि खोटे पसरवणारा नाही. खोटे बोलणे आणि अपप्रचार ही भाजपची भूमिका नाही. जर कुठे तक्रार केली असेल तर त्यातून सत्यच समोर येईल."

याचबरोबर, आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना विनंती केली आहे. ते म्हणाले, "माझी मा. महापौरांना विनंती आहे की, मी जे बोललोच नाही, तेच तुमचेच समर्थक सोशल मीडियावर लिहित आहेत, पसरवत आहेत. या बदनामी पासून तुम्हीच आता वाचायला हवे", असे आमदार आशिष शेलार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

दरम्यान, वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या घटनेत बालकाच्या व वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईचेही सोमवारी निधन झाले. ही घटना 30 नोव्हेंबरला झाली होती. यानंतर आशिष शेलार यांनी 4 डिसेंबरला पत्रकार परिषद घेत 'सिलिंडर स्फोटात 72 तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात' असे वक्तव्य केल्याची मीडियात चर्चा होती. यावर महापौरांनी आक्षेप घेतला आहे. 

काय म्हणाल्या महापौर?मुंबईची महापौर ही एक महिला आहे. प्रथम नागरिक असून ते अत्यंत महत्त्वाचे पद आहे. असे असताना माझ्याबाबत उद्गारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहेत. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्त्याचा मी निषेध व्यक्त करीत असून त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे त्यामुळे माझा व समस्त स्त्री जातीचा अवमान केला आहे. यामुळे शेलारांविरोधात पोलिसांत तक्रार करत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर  यांनी म्हटले आहे. या प्रकरणी महिला आयोगाने देखील अहवाल मागविला आहे. 

टॅग्स :आशीष शेलारकिशोरी पेडणेकर