- महेश पवारमुंबई - स्वरांच्या विश्वाला दिशा देणारा एक महान आवाज कायमचा शांत झाला. संगीताचा आत्मा अनंतात विलीन झाला. तिरंग्यात लपेटलेले ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पार्थिव पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. हा केवळ राज्य सन्मान नव्हता तर एका संगीत युगाला दिलेला अखेरचा सलाम होता. शिवाजी पार्क स्मशानभूमीबाहेर इंडियन आयडॉल स्पर्धकांनी, “त्या गेल्या नाहीत. त्या अजूनही आहेत. त्यांचा आवाज आमच्यासोबत आहे. आमच्या प्रत्येक सुरात, प्रत्येक गाण्यात, प्रत्येक हृदयात...” म्हणत अश्रुधारांनी आपल्या या गुरूसमान व्यक्तिमत्त्वाला अखेरचा निरोप दिला.
आशा भोसले यांचे पार्थिव शिवाजी पार्क स्मशानभूमीच्या दिशेने निघाले. तिथे बाहेर इंडियन आयडॉलचे स्पर्धक कलाकार चैतन्य देवडे, दिवाकर चौबे, अंकिता प्रधान, अभिषेक कुमार हे सर्व जण पार्थिवाची वाट पाहत होते. पण, प्रत्यक्षात ते वाट पाहत होते एका अशा आवाजाची, जो पुन्हा कधीच ऐकू येणार नव्हता. कोणी शांतपणे डोळे पुसत होते, कोणी आठवणींत हरवले होते, तर कोणी शब्दच हरवून बसले होते.
“लहानपणापासून त्यांच्या गाण्यांत आम्ही वाढलो. त्यांच्याकडून शिकत आलो. आज त्यांना अशा अवस्थेत पाहावे लागेल हे स्वप्नातही वाटले नव्हते...” चैतन्य देवडे थरथरत्या आवाजात सांगत होता. काही क्षण तो थांबला. पुढे म्हणाला, “त्यांच्यासोबत स्टेज शेअर करण्याचा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा भाग्याचा आणि आनंदाचा क्षण होता. त्यांच्यासमोर गाण्याची संधी मिळाली. त्यांनी कौतुक केले, मार्गदर्शन केले. आता आम्ही त्यांना पुन्हा कधीही भेटू शकणार नाही ही मनात खंत आहे. त्यांची गाणी आणि त्यांच्या आठवणी सदैव आमच्यासोबत असतील. आज असे वाटतेय की, संपूर्ण संगीताचा आत्माच हरवला आहे.” कधी कधी दुःख शब्दांत मावत नाही. ते फक्त अश्रूंमध्ये वाहते. अंकिता प्रधान हिचेही असेच झाले होते. “लहानपणापासून त्यांच्या गाण्यांतच आम्ही जगलो. त्यांच्या प्रत्येक सुरातून शिकत गेलो. आज असे वाटतेय आमच्यासारख्या प्रत्येक नवोदित गायकाची हजारो स्वप्नांना दिशा देणारी ‘संगीत शाळा’च हरवली आहे,” अशी भावना अंकिता प्रधान हिने व्यक्त केली.
Web Summary : Indian Idol contestants tearfully bid farewell to Asha Bhosle at her funeral. They remembered her guidance and influence, stating her voice and legacy live on in their music and hearts. They felt a great loss for the music world. Her songs and memories will always be with them.
Web Summary : इंडियन आइडल के प्रतियोगियों ने आशा भोसले के अंतिम संस्कार में उन्हें भावभीनी विदाई दी। उन्होंने उनके मार्गदर्शन और प्रभाव को याद किया और कहा कि उनकी आवाज और विरासत उनके संगीत और दिलों में जीवित है। उन्होंने संगीत जगत के लिए बहुत बड़ी क्षति महसूस की। उनके गीत और यादें हमेशा उनके साथ रहेंगी।